Who Is Yugendra Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अपवार घराणंही राजकीयदृष्ट्या विभागलं गेलं. अजित पवार, पार्थ पवार एका बाजूला तर दुस-या बाजूला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार अशी विभागणी झाली, त्यात आता पवार घराण्यातील आणखी एक पुतण्या.. तरुण चेहरा राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या सख्ख्या भावाचे सुपुत्र युगेंद्र पवार शरद पवारांना साथ देण्याची शक्यता आहे. कुस्ती स्पर्धा आयोजनाच्या निमित्तानं युगेंद्र पवार यांच्या राजकारणातल्या एंट्रीची चर्चा सुरु झालीय. कोण आहेत युगेंद्र पवार पाहुयात..
कोण आहेत युगेंद्र पवार?
अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. ते फलटण तालुक्यातील शरयू खाजगी साखर कारखान्याचं काम पाहतात. त्याचबरोबर ते विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार देखील आहेत. युगेंद्र पवार हे नेहमीच शरद पवारांसोबत असतात. युगेंद्र पवार हे बारामती कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे देखील राजकारणात येण्याची लोकांमध्ये चर्चा असल्याचं बोललं जातंय. मात्र, त्यावर अद्याप शरद पवारांकडून शिक्कामोर्तब झालं नाही. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र हे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांना भेटायला गेले होते. युगेंद्र पवार सातत्याने शरद पवार यांच्यासोबत असल्याने ते त्यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
युगेंद्र पवार हे बारामतीत अत्यंत सक्रिय आहेत. बारामतीतील सामाजिक कार्यक्रमातही युगेंद्र हे सक्रिय असतात. त्यामुळे युगेंद्र हे लवकरच शरद पवार गटात सक्रिय होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आजच्या कुस्ती सामन्याच्या आयोजनामुळे ही चर्चा अधिकच रंगलीय.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज (8 डिसेंबर) विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या दाखल केलेल्या याचिकेनंतर या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, आदिती झटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय.