सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं, भालके कुटूंबियांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. शरद पवार हे पंढरपूर येथून भारत भालके यांच्या सरकोली गावाकडे जात होते, तेव्हा शरद पवारांनी आपला ताफामध्येच थांबवला आणि वरवधूंना आशीर्वाद दिले. शरद पवारांनी असं अचानक येऊन, थांबून आशीर्वाद देण्याचा हा किस्सा राज्यात चर्चेचा विषय झाला आहे.
नवदाम्पत्याला पाहिल्यानंतर शरद पवार यांनी थांबून वधू-वरांना आशीर्वाद दिले. यानंतर ते पुढे मार्गस्थ झाले. शरद पवारांसोबत सोलापूरचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. यावेळी नवरदेव म्हणाला, 'भारत नानांची आठवण येते, पण त्यांचे वस्ताद शरद पवारांनी आशीर्वाद दिला याचा आनंद आहे''.
पंढरपुरातील गादेगाव येथील सुरज नवनाथ शिंदे आणि पुण्यातील उरळी कांचन येथील काजल हरी क्षिरसागर यांचा १७ डिसेंबर रोजी गादेगाव येथे विवाह सोहळा पार पडला. यानंतर हे नवदांपत्य ग्रामदैवत दर्शनाला जात होते, तेव्हा शरद पवारांची भेट झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भारत भालकेंच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी आणि भालकेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंढरपूरचा दौरा केला. यावेळी ते भारत नानांच्या आठवणीत भावूक झाल्याचं दिसून आलं. 'आमदार भालके यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे . त्यांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं आहे,' अशी खंत पवारांनी यावेळी व्यक्त केली.