Sharad Pawar On Nana Patekar Election Khadakwasala: राजकीय पक्षांना आगामी वर्षात म्हणजेच 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रामध्ये तर पुढील वर्षी लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणुकही होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अगदी जागा वाटपापासून ते आढावा बैठकींपर्यंतचे सत्र सध्या राज्यात सुरु आहेत. अशा परिस्थितीमध्ये मागील काही काळापासून मनोरंजनसृष्टीमधील नामांकित चेहऱ्यांना यंदाच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रामधील 2 नावं या यादीमध्ये आघाडीवर आहेत. सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने आणि दुसरी व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर. नाना पाटेकर पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवतील अशी चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु आहे. याचसंदर्भात बुधवारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया नोंदवली.
गणपती दर्शनाला नाना पाटेकर यांच्या घरी गेलेल्या अजित पवारांकडेही त्यांनी खडकवासल्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचा संदर्भ नानांच्या राजकीय एन्ट्रीसंदर्भातील चर्चेदरम्यान दिला जात आहे. नाना पाटेकर यांचं घेरा सिंहगड येथे फार्महाऊस आहे. नाना पाटेकरांना शेतीची विशेष आवड असल्याने त्यांचा अनेकदा खडकवासला येथे मुक्काम असतो. याचाही संदर्भ खडकवासला आणि नानांचा पॉलिटीकल एन्ट्रीला दिला जात आहे.
शरद पवार यांनी अयोध्येमधील राम मंदिरामधील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेपासून ते 'इंडिया' आघाडीचा चेहरा कोण याबद्दलच्या अनेक प्रश्नांना अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तरं दिली. याच पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांना नाना पाटेकरांबद्दल सुरु असेलल्या राजकीय चर्चेवरुनही प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी नाना पाटेकरांबरोबर आपले जवळचे संबंध असल्याचा उल्लेख आवर्जून केला. मात्र नाना पाटेकर यांच्या राजकीय एन्ट्रीसंदर्भात आपल्याला कल्पना नसल्याचं त्यांनी नमूद केलं.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पक्ष आता विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये सिने अभिनेत्यांना उमेदवारी देऊ पाहत आहेत. त्यांनी माधुरी दिक्षित यांना ऑफर केली आहे. खडकवासला मतदारसंघातून नाना पाटेकर लढू इच्छितात. काय सांगाल? असा सविस्तर प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला शरद पवारा यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. "असं काही नाना लढू इच्छितात ही तुमच्याकडूनच मला माहिती कळली आहे. खडकवाला माझ्या जवळ आहे. नाना पाटेकर आणि माझे घनिष्ठ संबंध आहेत. पण मी हे अजिबात ऐकलेलं नाही," असं शरद पवार म्हणाले.