औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे नंदू घोडेले विराजमान झाले आहेत.
हात उंचावून झालेल्या मतदानात घोडेले यांना १२४ पैकी ७७ मते मिळाली आहेत. तर उमहापौरपदी भाजपचे विजय औताडे यांची निवड झाली आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना भाजपची युती आहे. युतीच्या नियमानुसार अडीच वर्षे झाल्यानंतर महापौर पद शिवसेनेकडे जाणार होतं. त्यानुसार, भाजपनं पदाचा राजीनामा दिला आणि शिवसेनेकडे महापौर पद गेले.
खरं तर गेली काही दिवस भाजप बंडाच्या पवित्र्यात होतं, त्यामुळे भाजप महापौर पदाचा दावा सोडणार नाही असंच चित्र निर्माण झालं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भाजपला माघार घेण्याचे आदेश दिले आणि शिवसेनेला कुठल्याही अडचणी शिवाय महापौर पद मिळालं.