समृद्धी महामार्गाविरोधाच्या लढ्याचं प्रतिक... नाशकातलं 'शिवडे' गाव

नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलंय. त्यामुळे इथं प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. तरीही एका गावानं मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षेपुढे अजूनही गुडघे टेकलेले नाहीत. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 15, 2018, 09:01 PM IST
समृद्धी महामार्गाविरोधाच्या लढ्याचं प्रतिक... नाशकातलं 'शिवडे' गाव title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलंय. त्यामुळे इथं प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. तरीही एका गावानं मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षेपुढे अजूनही गुडघे टेकलेले नाहीत. 
  
समृद्धी महामार्गाला असलेला शेतकऱ्यांचा विरोध हळूहळू मावळतोय. पण नाशिकमध्ये एक असंही गाव आहे जे अजूनही या समृद्धीला भुललेलं नाही... या गावात शेतकऱ्यांची एकजूट अजून कायम आहे. अंदाजे आठ हजार लोकसंख्या असलेलं शिवडे गाव आज समृद्धी महामार्गा विरोधातील लढ्याचं जणू प्रतीकच बनलंय. 

या गावातले शेतकरी अजूनही समृद्धी प्रकल्पाविरोधाच्या भूमिकेवर ठाम आहेत. या गावानं अजूनपर्यंत शासनाचे जमिनीच्या मोजणीचे मनसुबे पूर्ण होऊ दिलेले नाहीत, इतकी त्यांच्या एकीत चिकाटी आहे.

एकाबाजूला बारमाही बागायती शेती, शेतातल्या ७० विहिरी आणि दुसऱ्या बाजूला प्रकल्पबाधित होण्यामुळे खुणावत असणारा जमिनीचा घसघशीत मोबदला, यातलं नेमकं काय निवडावं? या विवंचनेनं शेतकऱ्यांच्या मनात थैमान घातलंय.

नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यातून १०० किलोमीटर इतका समृद्धी महामार्ग जातोय. त्यासाठी १२०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यापैंकी खाजगी (शेतकरी) ११०० हेक्टर आणि १०० हेक्टर जमीन वन विभाग आणि शासनाची मिळून आहे.

इगतपुरीत ७५० आणि सिन्नरमध्ये ४५० हेक्टर भूसंपादन केलं जाणार आहे. दोन्ही तालुक्यांमध्ये एकूण ४९ गावं प्रकल्पबाधित होत आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांकडून आत्तापर्यंत ६०० हेक्टर जमिनीची प्रत्यक्ष खरेदी झालीय. 

समृद्धी महामार्ग हा प्रकल्प मुख्यमंत्र्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे 'आले राजाच्या मनी' असं सार्वत्रिक मत इथल्या शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळतंय.