मुंबई : युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेनं नवा नारा दिला आहे. आधी काश्मीर नंतर मंदिर असा नवा नारा शिवसेनेच मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आलाय. यावेळी विशेष म्हणजे शिवसेनेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूरात सूर मिसळल्याचे दिसत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर राममंदिराचा मुद्दा तूर्त बाजूला ठेवून काश्मीरचा प्रश्न आधी सोडवावा. त्यासाठी देशात मजबूत आणि स्थिर सरकार असावं अशी इच्छाही शिवसेनेनं व्यक्त केलीय. राज्यात युती होण्याआधी राम मंदिर मुद्द्यावरून भाजपाला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेने आपला निशाणा बदललेला दिसत आहे.
कश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी देशाला एका मजबूत आणि स्थिर सरकारची गरज आहे. स्थिर सरकार व मजबूत पंतप्रधान असल्याशिवाय दहशतवादाचा बीमोड होणार नाही तसेच पाकिस्तानला धडा शिकवता येणार नसल्याचे मत आरएसएसने व्यक्त केले होते. शिवसेनेनेगी त्याला दुजोरा दिला आहे. मजबूत पंतप्रधान असल्याशिवाय कश्मीरचा प्रश्न सोडवता येणार नाही. म्हणूनच राममंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम वगैरे विषय कुलूपबंद करून फक्त कश्मीर, पुलवामा, स्थिर सरकार अशाच विषयांवर जनतेचे लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
काश्मिर प्रकरणावरून आता सेनेने कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे. कश्मिरी तरुण, कश्मीरची उत्पादने, पर्यटन यावर बहिष्कार टाकण्याची भाषा फाजील देशप्रेमाचे प्रदर्शन असल्याचे म्हणत कॉंग्रेसला डिवचले आहे. आम्हाला कश्मीर हवे, पण कश्मिरी नकोत असे सांगताना चिदंबरम यांना नेमके काय म्हणायचे आहे ते आता राहुल गांधी यांनीच देशाला समजावून सांगावे असे शिवसेनेने म्हटले आहे.