मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये नाणार तेलशुद्धीकरण केंद्रावरून निर्माण झालेला संघर्ष आता टीपेला जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत हा प्रकल्प दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे जाहीर आभार मानले आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं. कालच धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वात झालेल्या तेलशुद्धीकरणाच्या करारावरून मंत्रीमंडळात शिवसेनेच्या मंत्र्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे कुठल्याही स्थितीत नाणारमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार खुद्द उद्धव ठाकरेंनी केला. त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही भूमिका आता संघर्ष टोकाला नेणारी आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उद्योगमंत्र्यांना डावलून सामंजस्य करार करणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांनी उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी काय चर्चा करायची ती गावकर्यांशी करावी. प्रकल्पाला स्थानिक ग्रामपंचायतींचा विरोध आहे. त्यामुळं मोजणी होऊ शकत नाही. तेव्हा प्रकल्प कसा होणार अशा शब्दात उद्योगमंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी भाजपला फटकारले आहे. त्याचप्रमाणे कॅबिनेट बैठक मंगळवारी असते. मुंबईत नवीन उद्योग धोरणाविषयी।महिला उद्योजकांसोबत चर्चेचा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने मंत्री मंडळ बैठकीवर बहिष्कार घालण्याचा मुद्दाच नाही असेही देसाई म्हणाले. पुण्यात आगामी उद्योग धोरणाबाबत उद्योजकांशी बैठकीनंतर देसाई बोलत होते.