उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग : तळकोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. त्यातच एक अनोखी प्रथा परंपरा आहे ती म्हणजे गावपळण. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात सुद्धा ही प्रथा अखंडित सुरू आहे. शिराळे गावच्या गाव पळणीला सुरवात झाली असून आता पाच दिवस हे गाव वेशीबाहेर वसणार आहे.
सिंधुदुर्गातील शिराळेच्या गावपळणीला सुरुवात 450 वर्षांची परंपरा जपणाऱ्या शिराळे गावच्या गावपळणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. गावपळणी दरम्यान शिराळेवासीय पाळीव प्राण्यांसह आणि लागणारा धान्याचा साठा घेऊन नजीकच्या सडूरे गावाच्या हद्दीत दडोबा डोंगराच्या पायथ्याशी राहुट्यामध्ये विसावले आहेत.देवाला कौल लावून हुकूम घेतला जातो. त्यानंतर गावाबाहेर सर्व लोक बाहेर पडतात. तसेच गावभरणीच्या वेळी सुद्धा देवाला कौल लावूनच गाव भरणी केली जाते.देव गांगोचा हुकूम मिळत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेर राहतात. त्यामुळे तीन, पाच, सात दिवसांची ही गावपळण असते. तळकोकणात काही ठराविक गावात गावपळणीची प्रथा आहे.मात्र दरवर्षी होणारी ही एकमेव गावपळण.
या शिराळे गावातील ही दृष्य पाहिली की वाटेल की गावात घरे आहेत पण माणसे कुठे दिसत नाही. गावच्या प्रथेनुसार वर्षातून एकदा इथे गाव सोडावा लागतो आणि पाच दिवस गावात कोणी माणूस थांबत नाही असं इथले स्थानिक ग्रामस्थ सांगतात. तसेच जनावरे पाळीव प्राणी, कोंबड्या, गुरे ढोरे,सर्व वेशी बाहेर घेऊन जावे लागते. गावात शाळा सुद्धा पाच दिवस भरत नाही. ती सुद्धा गावाबाहेर भरवली जाते. त्यामुळे या गावात फक्त स्मशान शांतता असते.
या गावपळनीसाठी चाकरमानी, माहेरवशनी ही आवर्जून हजेरी लावतात. तीन दिवसानंतर गावच्या देवाला कौल लावून पुन्हा हे ग्रामस्थ माघारी गावात येतात. ही गावपळनीचा आनंद लुटण्यासाठी चाकरमानी देखील हजेरी लावतात. दरम्यान, महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेतल्यास परंपरा टिकवण आणि त्यांचा आनंद घेण निरंतर शक्य होईल जर म्हटलं तर श्रद्धा नाहीतर अंधश्रद्धा होऊ शकते.
ही वाडवडिलांनी सुरु केलेली 450 वर्षांची परंपरा आहे. मंदिरात जाऊन कौल प्रसाद घेतल्यानंतर आम्ही सीमेच्या बाहेर येतो. इथे झोपडी बनवून पाच दिवस राहतो. काही पाळीव प्राणी, जनावर असेल तर त्यांनाही सोबत घेऊन येतो. इथे पाच दिवस झाल्याशिवाय परत जात नाही, असे इथल्या ग्रामस्थाने सांगितले.