पुणे : ST bus strike : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने खासगी प्रवासी बस, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र खासगी वाहतूक करणारे अव्वाच्या सव्वा दर आकारत असून प्रवाशांची अक्षरशः लूट केली जात आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (ST bus strike - Private vehicles are allowed to carry passengers, extra money is being taken from passengers)
पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलन सुरु आहे. शिवाजीनगर एसटी डेपो बाहेर अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने काढलेला जीआर मान्य नाही, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. सरकार विरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी अर्धनग्न आंदोलन सुरु आहे, असे ते म्हणाले.
पुण्यातील शिवाजीनगर एसटी डेपोच्या बाहेर खासगी बसेस मोठ्या प्रमाणावर लागल्यात आणि त्यांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. औरंगाबाद, नाशिक जाणाऱ्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात आहे.
दरम्यान, एसटीच्या पुणे विभागातील कर्मचार्यांनी दिलेल्या बंदची हाकमुळे सोमवारी एसटीच्या पुणे विभागाला 60 लाखांचा फटका बसला आहे. तर दैनंदिन एसटीने प्रवास करणार्या 1 लाख 20 हजार प्रवाशांची विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी मोठी फरफट झाली. तर सोमवारी नियोजित 1600 च्या घरात फेर्या रद्द झाल्या.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात 13 डेपो आहेत. या डेपोंच्या मार्फत प्रवाशांना सारवजनिक वाहतूक सेवा पुरविली जाते. मात्र, एसटी कर्मचार्यांनी सोमवारी प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. शिवाजीनगर एसटी डेपोमध्ये अनेक प्रवासी अडकले आहेत. काहींनी खासगी बसची वाट धरली. मात्र, त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागलेत.
एसटी कर्मचार्यांच्या प्रश्नांवर न्यायालयाच्या सूचनेनुसार तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव एसटी कर्मचारी संघटनांनी सोमवारी फेटाळला. यामुळे राज्यातील एसटी सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. सरकारने संपकरी कर्मचार्यांवर कारवाईचा इशारा दिल्याने संप चिघळण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करून कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणी हा संप सुरु आहे.