मुंबई : ST bus strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. (ST employees strike ) मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने ( Maharashtra govt) जीआर (GR) काढूनही संप सुरु ठेवल्याने न्यायालयाने संपकऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करून संप सुरूच ठेवणाऱ्या संघटना आणि कर्मचाऱ्यांविरोधात एसटी महामंडळाला अवमान याचिका दाखल करण्याची सूचनाही न्यायालयाने केली. त्याचवेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनीही संपकऱ्यांना इशारा दिला आहे. न्यायालयाचा अवमान करु नका. अन्यथा याचिका दाखल होऊ शकते, असे ते म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरण करावे आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, या मागण्यांसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सोमवारीही तोडगा निघाला नाही. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची आणि त्याबाबतचा शासन आदेश (GR) काढण्याची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली. संप सुरूच ठेवणाऱ्या कामगार संघटनांवर उच्च न्यायालयाने सोमवारी ताशेरे ओढले. एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू ठेवला आहे. संप सुरु ठेवणाऱ्या संघटना आणि कर्मचाऱ्यांविरोधात एसटी महामंडळाला अवमान याचिका दाखल करण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे. तसेच राज्य सरकारकडूनही कारवाईचा इशारा दिला आहे. असे असताना संपकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर आणि समितीच्या पहिल्या बैठकीनंतर संप मागे घेण्याची भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली. या बैठकीचा इतिवृत्तान्त सायंकाळी पाच वाजता न्यायालयात सादर करण्यात आल्यावर आणि कर्मचारी संघटनेच्या वकिलांनी त्याला संमती दिल्यावर संघटनेचे प्रतिनिधी तातडीने संप मागे घेतील आणि कर्मचारी कामावर रूजू होतील, असेही न्यायालयाने त्यावेळी स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप संप सुरुच आहे. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान होत आहे.
एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहे. हा आमचा लढा शेवटचा आहे. ही आरपारची लढाई आहे. आम्हाला सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा होती. शासननिर्णय आम्हाला मान्य नाही. तुरुंगात जाऊ, परंतु संप मागे घेणार नाही, असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेतर्फे अॅड्. गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्टे केले आहे.
दरम्यान, राज्यातील बहुतांश एसटी आगारांतील बस सेवा ठप्प होण्यास सोमवारी पहाटेपासून सुरुवात झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. औरंगाबाद, मुंबई , नागपूर, पुणे , नाशिक, अमरावती या विभागातील अनेक आगारे बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यातील 250 पैकी 240 आगारे बंद झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दिवाळी साजरा करुन घरी परतणाऱ्यांना याचा मनस्ताप झाला. खासगी वाहतुकीचा प्रवाशांनी आधार घेतला खरा पण त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागले.