सांगली : राज्यभरात महाविद्यालयीन प्रवेश सध्या सुरु आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. पण अनेकदा ते वेळेत उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे विध्यार्थ्यांसाठी जलदगतीने जातपडताळणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जातपडताळणीचे टोकन असणाऱ्यांना सुद्धा महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या सूचना सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज येथील जिल्ह्यातील पहिल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी मंत्री खाडे बोलत होते.
विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना शैक्षणिक अडचण येऊ नये यासाठी जलद गतीने जातपडताळणी करून दाखले दिले जात आहेत. तसेच जातपडताळणीचे टोकन असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल देताना, आता लाभार्थीला अडीज लाखाची सबसीडी दिली जात आहे. मात्र याच योजनेला रमाई योजना जोडली तर मागासवर्गीय कुटुंबाला आणखीन अडीच लाखाची सबसीडी देता येणं शक्य आहे आणि याबाबत प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.
अनुसूचित जाती-जमातीच्या कुटुंबात रक्तातील नात्याच्या एका व्यक्तीची जात पडताळणी झाली असेल तर अन्य कागदपत्र-पुरावे परत देण्याची आवश्यकता नाही असा शासन निर्णय आहे. मात्र जातीचा दाखला काढताना, अश्या कुटुंबातील सदस्याकडे जर पुन्हा अन्य कागदपत्र-पुरावे मागितले गेले तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही डॉ. सुरेश खाडे यांनी दिला आहे.