सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या बारामती लोकसभा मतदार संघातील खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) मटण (mutton) खाऊन मंदिरात गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे या दर आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी त्यांच्या मतदारसंघाचा दौरा करतात. शनिवारी झालेल्या त्यांच्या दौऱ्यावर शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे (vijay shivtare) यांनी गंभीर आरोप केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचे दर्शन घेतले असा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे.
विजय शिवतारे यांनी फेसबुक पोस्ट करत हे गंभीर आरोप केले आहेत. विजय शिवतारे यांनी फेसबुकवर सुप्रिया सुळे यांचा हॉटेलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुप्रिया सुळे या मी हीच थाळी खाल्ली असे म्हणताना दिसत आहेत. यानंतर सुप्रिया सुळे यांनी महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे फोटो शिवतारे यांनी शेअर केले आहेत.
काय म्हटंलय फेसबुक पोस्टमध्ये?
"आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला," असे शिवतारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
या प्रकरावरुन पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझा अभ्यास या विषयावर खूपच कमी आहे. तुम्ही जर पाण्यावर, बेरोजगारीवर तसेच आजच्या अर्थव्यवस्थेवर मला प्रश्न विचारल तर मी त्यावर सांगेल. पण माझा यावर अभ्यास खूपच कमी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लोकसभेमध्ये महागाईवर चर्चा व्हायला हवी
सगळ्या विरोधी पक्षाच्या भावना एका पत्राद्वारे पंतप्रधान मोदी यांच्या पर्यंत पोहचवल्या असतील तर अर्थात या देशात काय परिस्थितीती आहे यावर चर्चा व्हायला पाहिजे. आमची केंद्राला विनंती आहे की लोकसभेमध्ये महागाईची चर्चा व्हायला पाहिजे. गॅस दरवाढ बरोबर महागाई आणि बेरोजगारी या विषयाबद्दल आम्ही बोलत आहोत. आपली निर्यात कमी झाली आहे. देशात कांद्याला भाव नाही. पॉलिसी लेवल वर काय काम करत आहे सरकार यावर चर्चा व्हायला पाहिजे.