Supriya Sule On Farmers Issue: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी आपल्या 'एक्स' (पूर्वीचे ट्वीटर) अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका शेतकऱ्याने बँकेतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचं हॅण्डल टॅग करत या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हॅण्डलही टॅग केलं आहे.
"औंढा तालुक्यातील जोडपिंपरी येथील शेतकरी भुजंग माणिकराव पोले हे शेतकरी बॅंकेत पीककर्ज मागण्यासाठी गेले असता त्यांना ते नाकारण्यात आले. वारंवार पाठपुरावा करुनही बॅंकेने त्यांना कर्ज दिले नाही. अखेर कंटाळून भुजंग पोले यांनी बॅंकेतच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बॅंक आता त्यांचे सिबील खराब असल्याचे कारण देत आहे. हि कहाणी एकट्या भुजंग पोले यांची नाही. राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील बहुतेक शेतकऱ्यांची हिच कहाणी आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
"पीक कर्जात थकितचे प्रमाण वाढल्याचे कारण देऊन कर्ज मंजुरीचे अधिकार बॅंकांनी आपल्या झोनल कार्यालयांना दिले आहेत. परिणामी कर्ज मंजूर व्हायला अडचणी येतात. अशी कित्येक प्रकरणे झोनल कार्यालयांमध्ये प्रलंबित आहेत. शेतीच्या कामासाठी वेळेत कर्जपुरवठा न झाल्याने शेतकरी नाईलाजाने बिगर बँकिंग संस्था, मायक्रो क्रेडिट इन्स्टिट्यूशनकडून चढ्या दराने कर्ज घेतात. यानंतर ते व्याजाच्या दुष्टचक्रात अडकतात," असं निरिक्षणही सुप्रिया सुळेंनी नोंदवलं आहे. "शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबील लागू करणे, बॅंकाची कृषी क्षेत्राबाबतची अनास्था आणि शेतकऱ्यांप्रतीचा उदासीन दृष्टीकोन यामुळे हि परिस्थिती उद्भवते. हे एकंदर पतपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचे अपयश आहे," अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.
"वास्तविक मे 2023 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे बोलताना शेतकऱ्यांना सिबील मागणाऱ्या बॅंकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. ही घोषणा केल्यानंतर आजवर किती बॅंकांवर कारवाई करण्यात आली याची माहिती उपमुख्यमंत्री महोदयांनी जाहीर करणे आवश्यक आहे. किमान भुजंग पोले यांच्याप्रकरणी तरी शासन संबंधित बॅंकेवर कारवाई करणार आहे का?" असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.
"एकीकडे कार्पोरेटसची अब्जावधी रुपयांची कर्जे राईट ऑफ करायची आणि जगाच्या पोशिंद्याला शेतीसाठी पैसा देताना ताटकळत उभा करायचे हा विरोधाभास बरा नाही," असंही त्या पोस्टच्या शेवटी म्हणाल्या आहेत.