NCP Supriya Sule Press Conference: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकारी अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आज पहिल्यांदाच मुंबईमधील पक्ष कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांचं फुलांचा वर्षाव करुन जंगी स्वागत कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं. सुप्रिया सुळेंनी यावेळी घेतलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये सुप्रिया सुळेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. याचवेळी एका प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी उपहासात्मक पद्धतीने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत जनतेचा एक आवाहन केलं आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेची तयारी सुरु केल्याचंही सांगितलं. सुप्रिया सुळेंनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करताना नगरसेवक, जिल्हापरिषदांमधील नेमणुका न झाल्याने राज्य कोण चालवतंय असा प्रश्नच असल्याचा टोलाही लगावला.
"मरिन ड्राइव्हला जे प्रकरण झालं त्या मुलीचे पालक मला भेटले. त्यांनी माझ्याकडे काही मागण्या केल्या. महिलांविरोधातील गुन्हेगारी वाढत आहे. यासाठी महाराष्ट्रातील गृहमंत्रालय जबाबदार आहे," असं सुप्रिया सुळेंनी पत्रकारपरिषदेत महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील चिंता व्यक्त करताना म्हटलं. यावेळी एका पत्रकाराने विरोधक अतिशयोक्ती करतायत असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे असा संदर्भ देत प्रश्न विचारला. त्यावर सुप्रिया सुळेंनी हसत, "मी अजूनही लोकशाहीत जगते त्यामुळे माझ्यावर टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे," असं उत्तर दिलं.
सुप्रिया सुळेंनी राज्यातील आर्थिक गैरव्यवहारांवरही यावेळेस भाष्य केलं. "महाराष्ट्रात बरीच रॅकेट सुरु आहेत. एक एका मंत्र्याकडे 10 ते 15 खाती आहेत. नगरसेवक नाहीत, जिल्हापरिषदांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार कोण चालवतंय असा प्रश्न आहे. म्हणजे जगात काही सुपरमॅन नाहीत ना? सत्तेचं विकेंद्रीकरण गरजेचं असतं. जसं चव्हाण साहेबांनी केलं. सत्तेचं इफेक्टीव्ह मॅनेजमेंट आवश्यक असतं. पुण्यासारख्या शहरात बघा एक पालिका आयुक्त संपूर्ण शहर चालवतोय. जिल्हापरिषदेत पण हीच स्थिती आहे. त्यामुळे एका माणसाला एवढं सारं मॅनेज करणं अशक्य आहे. सातत्याने सत्ता एकाच ठिकाणी केंद्रीत ठेवणं याला दडपशाही म्हणा किंवा लोकशाहीपासून दूर देश आणि राज्याचा कारभार सुरु आहे अशी भावना मनात येणारच," असं सुप्रिया यांनी म्हटलं.
जाहिताबाजी आणि त्यानंतरच्या बॅनरबाजीवरुन सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारत या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता असं विचारण्यात आलं. "कोट्यवधी रुपयांच्या पूर्ण पानभर जाहिराती देणारे हितचिंकतांचा शोध दादा आणि मी महाराष्ट्रभरात शोध घेत आहोत. दादा आता जळगावला गेला आहे. मी त्याला तिथेही कोणी भेटतंय का बघ बाबा असं सांगितलं आहे. मी काल दिवसभर पुण्यात शोधलं पण असा कोणी हितचिंतक भेटला नाही. आज मुंबईत मी बऱ्याच दिवसांनी आले आहे. व्यासपिठावरील सर्व सहकाऱ्यांना विनंती करेन की आपली बैठक झाल्यानंतर हे मोठ्या मनाचे हितचिंतक कोण आहेत ते आपल्या पक्षालाही मिळायला हवेत. तसे प्रत्येक पक्षाला मिळायला हवेत. तसेच प्रसारमाध्यमांना पूर्ण पानभर कोट्यावधी रुपयांच्या जाहिराती मिळणार असतील तर ही विन विन सिच्युएशन आहे. म्हणजे आमचंही भलं होईल आणि तुमचंही भलं होईल. आम्ही शोधात आहोतच. तुम्हाला कोणी सापडला तर सांगा. मी तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि देशाला आवाहन करतेय की असे कोणी हितचिंतक भेटले तर प्लिज माझा, जयंतरावांचा (राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील) आणि दादाचा (अजित पवारांचा) नंबर प्लिज त्यांना द्या," अशी उपहासात्मक प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी नोंदवली.
पुढे सुप्रिया यांनी, "हे दुर्देवी आहे. आपण हे हसण्यावारी नेत आहे. पण पक्ष आणि सत्तेत असलेले एवढे मोठे नेते जर जाहिरात आणि बॅनरबाजीत अडकत असतील तर राज्याचं काम कुठल्या दिशेने चाललं आहे? राज्याला धोरण लकवा झाला आहे. कारण या राज्यात तू-तू मै-मै सुरु आहे. मी कोणता बॅनर लावला, मी कोणाचा अपमान केला, मी कसं कोणाला खाली दाखवतो, मी तुला कसा कॅबिनेटमधून बाहेर करतो यातच ते असतील तर हा धोरण लकवाच आहे. महाराष्ट्रात कामच थांबलेलं आहे. कारण इतर कामांमध्येच सर्वजण व्यस्त आहेत," अशी टीका केली.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कामाचं विभाजन झालं आहे. माझा मतदारसंघ महाराष्ट्राचा आहे. माझ्यावर संघटनेचं काम आहे. दिल्लीतील प्रफुल्लभाईंची राज्यसभा आहे. लोकांकडून हे राहून गेलं आहे की मला लोकसभेची जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीमध्ये माझ्या एकटीवर जबाबदारी नाही हे टीमवर्क आहे. प्रत्येकाची जबाबदारी वेगळी आहे. लोकसभेच्या तयारीला राष्ट्रवादीने तयारी सुरु केली आहे. अनेक बैठकी झाल्यात. चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकाही होतील," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.