पुण्यात कोयत्या गँगने कळस गाठला, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुण्यात कोयत्या गँगची दहशत वाढतच चालली आहे. कोयता दाखवून धमक्या दिल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी दाखल होत असतानाच आता कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

सागर आव्हाड | Updated: Jul 14, 2023, 02:21 PM IST
पुण्यात कोयत्या गँगने कळस गाठला, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात कोयता गँगकडून (Koyta Gang) दहशत पसरवण्यासाठी गाड्यांची तोडफोड करणं, भर रस्त्यात कोयता दाखवत धमकावणं असे प्रकार सर्रास सुरु असतात. पण आता कोयता गँगने कहर केला आहे. पुण्यातल्या (Pune) उरळी कांचनमधल्या हवेली तालुक्यात कोयत्याचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीग आपल्या कुटुंबियांसह उरळी कांचन इथल्या दत्तवाडी परिसरात राहाते.  आई-वडिलांना कोयत्याने जीवे मारण्याची धमकी देत दोन आरोपी त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होते. 

बुधवारी मध्यरात्री पीडित मुलीची आई लघुशंकेसाठी बाहेर आले असता तिला आरोपी अयुब आणि इरफान मुलीच्या खोलीबाहेर दिसले. मुलीच्या आईला पाऊन त्यांनी तिथून पळ काढला. मुलीच्या आईने तात्काळ मुलीला विचारलं असता मुलीने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आईला सांगितला. आई, वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन मागील पंधरा दिवसांपासून आरोपी या मुलीवर अत्याचार करत होते. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन नराधमांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. स्थानिकांनी शनिवारी उरळीकांचन बंद ठेवण्याची हाक दिली आहे. 

सुप्रिया सुळे यांनी केलं ट्वट
खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी व्यक्त संताप व्यक्त केला आहे. सुप्रीया सुळे यांनी ट्विट केलं असून यात त्यांनी म्हटलंय, उरुळी कांचन ता:हवेली येथे कोयत्याचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हे अतिशय संतापजनक असून या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून तातडीने कारवाई करावी. हे ट्विट सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट केलं आहे. 

एकतर्फी प्रेमातून हल्ला
पुण्यात गुंडांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खराडी इथे आय टी कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर एकतर्फी प्रेमातून लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.  कोरेगाव पार्क पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे संकेत शहाजी म्हस्के असं आरोपीचं नाव आहे. याबाबत येरवडा इथल्या 37 वर्षाच्या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट इथं बुधवारी सकाळी सात वाजता घडला
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला खराडी इथल्या आय टी कंपनीत नोकरी करते. या महिलेचा घटस्फोट झाला आहे. 

काही महिन्यांपूर्वी संकेत म्हस्केशी या महिलेची ओळख झाली होती. त्याच्याबरोबर आणखी एकाबरोबर त्यांची मैत्री झाली होती. दरम्यान, त्यांचा घटस्फोट झालेला पती पुन्हा महिलेच्या संपर्कात आला होता. संकेत म्हस्के याने एक महिन्यांपूर्वी माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला आवडते, असे म्हणून महिलेजवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण महिलेने त्याला नकार दिला. याचा राग मनात धरुन संकेतने महिलेला रस्त्यात अडवत शिवीगाळ केली आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली.