Uddhav Thackeray: काँग्रेस-राष्ट्रवादीने सोडली ठाकरे गटाची साथ? विधिमंडळात नेमकं असं घडलं तरी काय?

Maharashtra Budget Session 2023: सुप्रीम कोर्टात शिंदे गट- ठाकरे गटात सत्तासंघर्षाची लढत आहे.  शिंदे गट हा ठाकरे गटाविरोधात अनेक डाव पेच खेळत आहे. त्यातच आता विधिमंडळात काँग्रेस,राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे गट एकाकी पडल्याचे दिसत आहे.  

Updated: Mar 1, 2023, 03:55 PM IST
Uddhav Thackeray: काँग्रेस-राष्ट्रवादीने सोडली ठाकरे गटाची साथ? विधिमंडळात नेमकं असं घडलं तरी काय? title=

Maharashtra Budget Session 2023:   शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीस (Devendra Fadnavis ) सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन (Mumbai News) चांगलेच गाजत आहे. विरोधक आक्रमक झाले असले तरी ठाकरे गट एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे. संजय राऊत (Sanjay Raut) वक्तव्य प्रकरणात काँग्रेस (Congress),राष्ट्रवादीने (NCP) ठाकरे गटाची साथ सोडल्याचे चित्र पहायला मिळाले. संजय राऊत यांच्या हक्कभंगाच्या कारवाईवरुन महाविकासआघाडीत (mahavikasaghadi) मतभेद पहायला मिळाले. 

सजंय राऊत नेमकं काय म्हणाले?

विधिमंडळ हे चोरमंडळ आहे असं धक्कादायक विधान खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात केले. संसदेतील गटनेतेपद काढलं तरी हरकत नाही, शिंदे गट चोरमंडळ, विधिमंडळ हे चोरमंडळ आहे असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार गदारोळ झाल्यावर राऊत यांनी यू टर्न घेतला. 

संजय राऊतांच्या वक्तव्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र नाराजी

संजय राऊतांच्या वक्तव्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातून तीव्र नाराजी व्यक्त झाली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही याच विधीमंडळाचे सदस्य आहेत याची आठवण उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी करून दिली. तर, अजित पवारांनीही शाहनिशा करून कारवाई करावी असं म्हटलंय. काँग्रेसनेही राऊतांच्या विधानावर असहमती दर्शवली.

संजय राऊतांच्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी अलिप्त का?

संजय राऊतांच्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी अलिप्त का असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण, एकीकडे संजय राऊत यांच्यावर कारवाईसाठी सत्ताधारी सभागृहात आक्रमक झाले होते. तर, दुसरीकडे मविआचे घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मात्र शांतच बसले होते. उलट अजित पवार आणि नाना पटोलेंनी राऊतांच्या हक्कभंगाचं समर्थनच केलं. त्यामुळेही ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. दरम्यान, संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊतांनी यांनी ठाकरे गट एकाकी पड़ल्याचं फेटाळून लावले आहे.

संजय राऊत यांना वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. राऊत यांच्याविरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी हक्कभंग सूचना मांडली. सभागृहाची भावना ऐकून अध्यक्षांनी हक्कभंगावर 2 दिवसांत सखोल चौकशी करून 8 मार्चला निर्णय देणार असल्याचं म्हटलंय. तर, अटकेचा निर्णय उपमुख्यमंत्री घेतील असं विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटले. 

संजय राऊतांना तातडीनं अटक करा - शिंदे गटाची मागणी

संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन शिंदे गट चांगलाच आक्रमक झालेला पहायला मिळाला. संजय राऊतांना तातडीनं अटक करा अशी मागणी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी केली. चोर आम्ही की संजय राऊत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. राऊतांच्या वक्तव्यावरुन गोंधळ झाल्यानंतर दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब झाली. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन केले.