अहमदनगर : अनेक जणांना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात गंडा घातल्याच्या घटना आपण ऐकत असतो. पण थेट देवालाच गंडा घातल्याचं आपण कधी ऐकलं आहे का. हो हे घडलं आहे, आणि तेही साईबाबांच्या शिर्डीत.
शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीत चक्क तीन कोटी रुपयांच्या बाद झालेल्या नोटा आढळल्या आहेत. भक्तांनी नोटबंदीनंतर बाद झालेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा साईंच्या चरणी दानपेटीत टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नोटाबंदीला पाच वर्षे उलटली तरी भक्तांकडून जुन्या नोटा दानपेटीत टाकल्या जात आहेत. यासाठी साई संस्थानने अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रायाला पत्र पाठवलं असून रिझर्व्ह बँकेला याबाबत निर्णय घेण्याचे निर्देशही केंद्रानं दिल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
२०१६ मध्ये नोटबंदी झाल्यानंतर भाविक दान पेटीत चलनातून बाद झालेल्या नोटा टाकू नयेत, असं आवाहन साई संस्थांकडून करण्यात आलं होतं. पण त्यानंतरही अनेक भाविक आजही जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकत आहेत. आतापर्यंत साई संस्थानाकडे सुमारे तीन कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जमा झाल्या आहेत. त्यामुळे आता साई संस्थानाकजून जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आली आहे.