Uddhav Thackeray Latest News: मुंबईचा अदानी सिटी करण्याचा डाव सुरू आहे हे मी आधी मांडलं होतं. धारावीकरांना धारावीतच घर मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे. एका धारावीची वीस धारावी कोणी करत असेल तर तो डाव आम्ही होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धारावी पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की, 'धारावीकरांना मुलुंड, दहिसर चेक नाका किंवा मिठागर, कुर्ला मदर डेअरीत टाकायचा डाव आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही. विकासकाची जर तिथे जमीनी असतील तर जिथे त्यांनी ट्रान्सिट कॅम्प बांधावे. पण धारावीकरांना घर हे धारावीतच मिळायला पाहिजे. धारावीकरांना बेघर होऊन मुंबईची विल्हेवाट लावून कोणत्या विकासकाचं स्वप्न आम्ही साकार होऊ देणार नाही.'
'आदित्य ठाकरे यांनी रस्ता घोटाळ्याचा विषय मांडला. म्हणजे लाडका कॉन्ट्रेक्टर ही त्यांची नवी योजना आहे. मुंबै बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा निर्णय संकेतस्थळावर टाकला गेला आणि काही मिनिटांतच तो जीआर मागे घेतला. आता तो जीआर मागे घेतला आहे की कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हा गपचूप कारभार केला गेलेला आहे. रात्रीस खेळ चाले तसा रात्रीच्या भेटीगाठीसारखा हा काही कारभार आहे का?,' असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
'मुळात हा पशुसंवर्धन खात्याचा भुखंड होता. तो काय म्हणून काढला आणि मुंबै बँकेला काय म्हणून दिला. मुंबै बँकेत सरकारमध्ये जे बसलेत त्यांचे चेले आहेत. म्हणून त्यांच्या घशात हा भूखंड काढला का. ही मुंबईची जागा आहे. आमचं सरकार दोन तीन महिन्यात येईल. तोपर्यंत हा निर्णय राहिला तर हा निर्णय आम्ही रद्दच करु, ज्या कामासाठी ते भूखंड ठेवले आहेत. त्या कामासाठीच त्याचा वापर होईल. अन्यथा दुसऱ्या कामासाठी त्याचा वापर केला गेला असेल तर ते आम्ही रद्द करु, असा विश्वास मी मुंबईकरांना देतो,' असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.