अंबरनाथमध्ये तुटवड्यामुळे लसीकरण बंद , 505 नवे कोरोना बाधित

एकमेव कोरोना लसीकरण (Corona Vaccination ) केंद्रावर लसींचा पुरवठा न झाल्यामुळे बंद पडले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून लसींचा पुरवठा न झाल्यामुळे लसीकरण बंद करण्याची वेळ अंबरनाथ पालिकेवर आली आहे. 

Updated: Apr 23, 2021, 04:01 PM IST
अंबरनाथमध्ये तुटवड्यामुळे लसीकरण बंद , 505 नवे कोरोना बाधित  title=
प्रतिकात्मक छाया

अंबरनाथ : शहरात सुरु असलेले एकमेव कोरोना लसीकरण (Corona Vaccination ) केंद्रावर लसींचा पुरवठा न झाल्यामुळे बंद पडले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून लसींचा पुरवठा न झाल्यामुळे लसीकरण बंद करण्याची वेळ अंबरनाथ पालिकेवर आली आहे. तर दुसरीकडे शहरात आज कोरोनाबाधितांचा नवा उच्चांक पाहायला मिळाला. कारण आज एकाच दिवसात तब्बल 505  नव्या कोरोनाबाधितांची अंबरनाथमध्ये नोंद झाली आहे.

 अंबरनाथ शहरात ऑर्डनन्स फॅक्टरीच्या हॉस्पिटलमध्ये अंबरनाथ नगरपालिकेनं कोरोना लसीकरण केंद्र सुरु केलंय. शहरातील या एकमेव लसीकरण केंद्रावर दिवसाला 450 नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस दिला जातो. वास्तविक पाहता शहराची लोकसंख्या लक्षात घेता दिवसाला किमान 1500 डोस देणं गरजेचं आहे. मात्र दुसरीकडे लसींचा पुरवठाच न झाल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ अंबरनाथ पालिकेवर आलीये. आज सकाळपासून अनेक नागरिक या लसीकरण केंद्राबाहेर जाऊन निराश होऊन परततायत. लसींचा पुरवठा कधी होईल, याबाबत काहीही सूचना नसून त्यामुळे अनिश्चित काळासाठी अंबरनाथ शहरातलं लसीकरण बंद झाले आहे. 

आधीच कोरिना रुग्णांचा वाढता आकडा, त्यात बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, रेमडेसिविर नाही, आणि त्यात आता लसीही नाहीत. त्यामुळे लोकांनी जगावं की मरावं? असा प्रश्न निर्माण झालाय.  शहरात आत्तापर्यंत दिवसाला सरासरी 200 रुग्ण आढळत होते. मात्र आज हा आकडा थेट 500च्या पुढे गेला आहे. याचं कारण म्हणजे मागील आठवड्यातल्या तीन दिवसांचे कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित होते. ते आज एकत्रितपणे अंबरनाथ पालिकेला मिळाले आहेत. 

धक्कादायक बाब म्हणजे हे अहवाल तब्बल 8 ते 9 दिवसांनी पालिकेला मिळाले आहेत. जोपर्यंत कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत नाही, तोपर्यंत रुग्णाला संशयित म्हणून गणलं जाते. कोव्हीड पॉझिटिव्ह म्हणून ग्राह्य धरले जात नसल्याने रुग्णाला कोव्हीड हॉस्पिटलमध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच रेमडेसिविर इंजेक्शन सुद्धा पॉझिटिव्ह अहवाल असल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे या तीन दिवसातल्या ज्या रुग्णांची प्रकृती खालावली, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागले.