परतीच्या पावसामुळं बिघडलं गृहिणींचे बजेट; भाज्यांचे दर कडाडले, वाचा काय आहेत दर

Vegetable Price Hike: दसऱ्यानंतर फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. भाज्या महागल्याने आता गृहिणींचे बजेट बिघडणार आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 14, 2024, 07:17 AM IST
परतीच्या पावसामुळं बिघडलं गृहिणींचे बजेट; भाज्यांचे दर कडाडले, वाचा काय आहेत दर  title=
Vegetable Price Hike maharashtra rising prices tomato

Vegetable Price Hike: परतीच्या पावसाने महाराष्ट्राला झोडपले आहे. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. पावसाचा फटका भाजी आणि फळांच्या उत्पदनावर होत आहे. फळभाज्यांची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. तसंच, येत्या काही दिवसांत दिवाळी आहे. अशावेळी भाज्या महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे. आवक कमी झाल्याने कोबी, फ्लॉवर, हिरवी मिरची, शेवगा, गाजर, घेवडा, ढोबळी मिरची, मटारच्या दरात वाढ झाली. तर, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. 

राज्य आणि परराज्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. परराज्यातून मार्केटमध्ये येणाऱ्या ट्रकची संख्याही कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेला पाऊस आणि दसऱ्यामुळं फळभाज्यांची आवक कमी झाली होती. ऐन दिवाळीच्या तोंडावर फळभाज्या व पालेभाज्यांच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे. 

मेथी, शेपू, कांदापात, करडईच्या दरात वाढ

मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई, चुका, चवळई या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. राजगिऱ्याच्या दरात घट झाली असून, कोथिंबिर, पुदीना, अंबाडी, मुळे, पालक या पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर दीड लाख जुडी, तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. 

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे 

कोथिंबीर- १००० ते १५००, मेथी – १५०० ते २०००, शेपू – १००० ते १५००, कांदापात- १५०० ते १८००, चाकवत – ४०० ते ८००, करडई- ५०० ते ८००, पुदिना – ५०० ते ८००, अंबाडी – ४०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ७००, चुका – ६०० ते १०००, चवळई- ४००-८००, पालक- १२००-१५००.

मोसंबी, पपई, चिकूच्या दरात वाढ

मोसंबी, पपई, चिकूच्या दरात वाढ झाली. पेरुच्या दरात घट झाली असून, डाळिंब, संत्री, कलिंगड, खरबूज, सीताफळाचे दर स्थिर असल्याची माहिती फळबजारातील व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी ४० ते ५० टन, संत्री ८ ते १० टन, डाळिंब १० ते १५ टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे आठशे ते एक हजार गोणी, कलिंगड ७ ते ८ टेम्पो, खरबूज ३ ते ४ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरू २०० प्लास्टिक जाळी (क्रेट), अननस ४ ट्रक, सीतापळ २० ते २५ टन अशी आवक झाली.