Video: 'ए मारणे, समजलं का? नेत्यांसोबतचे फोटो...'; पुणे पोलीस आयुक्तांचा गुंडांना दम

Video Pune Police Commissioner Gangsters Parade: संजय राऊत यांनी सोशल मीडियावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या खासदार पुत्राबरोबरचे गुंडांचे फोटो शेअर केल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 7, 2024, 09:14 AM IST
Video: 'ए मारणे, समजलं का? नेत्यांसोबतचे फोटो...'; पुणे पोलीस आयुक्तांचा गुंडांना दम title=
गुंडांना भरला सज्जड दम

Video Pune Police Commissioner Gangsters Parade: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरचे गुंडांचे फोटो उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर पुणे पोलिसांनी शहरातील गुंडांची ओळख परेडच काढण्याचं चित्र मंगळवारी पाहायला मिळालं. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंडांची ओळख परेड घेताना गुंडांना थेट इशाराच दिला आहे. सध्या अमितेश कुमार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

थेट नाव घेऊन इशारा

पुण्यातील 32 टोळ्यांमधील 267 गुंडांची ओळख परेड मंगळवारी पुण्यात काढण्यात आली. "ए घायवळ, ए मारणे... सांगितलं ते समजलं का? कोणत्याही राजकीय नेत्याला भेटू नको, नेत्यांबरोबरचे फोटो व्हायर करु नको, रिल्स बनवू नकोस, दहशत निर्माण होईल असे स्टेटस टाकलं तर बघाच...' अशा शब्दांमध्ये अमितेश कुमार यांनी पुण्यातील गुंडांना दम भरल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील सराईक गुंड असलेल्या हेमंत दाभेकरने मुख्यमंत्री शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घायवळ टोळीचा म्होरक्या नीलेश घायवळने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. संजय राऊत यांनी सोमवारी आणि मंगळवारी या भेटींचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत निशाणा साधला. 

कोणकोण होतं हजर?

याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पुण्यातील गुन्हेगार, गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रमुखांना पोलिसांनी समज दिली. पोलिसांनी समज देण्यासाठी बोलावलेल्या गुंडांमध्ये नीलेश घायवळ, सचिन पोटो, उमेश चव्हाण, गजानन मारणे, बाबा बोडके यांचा समावेश होता. तसेच ठोंबरे टोळीबरोबर बंटी पवार, आंदेकर टोळीचे गुंडही यावेळेस हजर होते. हे सर्व गुन्हेगार काय करतात, त्यांना जामीन देताना कोण जामीनदार राहिले आहेत याची माहिती पोलिसांनी घेतली. यापुढेही कोणत्या गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी होऊ नये, तसेच वारंवार मोबाईल नंबर बदलत असाल तर ते कळवण्याची जबाबदारी तुमच्यावर असल्याचंही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुंडांना समज देताना सांगितलं. अमितेश कुमार यांनी थेट काही गुंडांना प्रत्यक्षात समज दिली. 'ए घायवळ, ए मारणे सांगितलं ते समजलं का? नेत्यांबरोबरचे फोटो व्हायरल करु नको,' असं म्हणत अमितेश कुमार यांनी समज देत होते त्या वेळेस गुंड गजानन मारणे हात जोडून उभा असल्याचं पाहायला मिळालं.

अनेक कुख्यात गुंड आपली दहशत निर्माण करण्यासाठी हातात कोयता, पिस्तूल घेऊन गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रिल्स सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. हे असे व्हिडीओ अनेकदा स्टेटसला ठेवले जातात.

गुन्हेगारी स्वरुपाचे रिल्स यापुढे तयार केले आणि ते स्टेटस किंवा सोशल मीडियावरुन व्हायरल केल्यास कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस उपायुक्त अमोल झेंडेंनी सांगितलं.