आतिश भोईर, प्रतिनिधी, झी मीडिया, डोंबिवली : एकीकडे शिवसेना-भाजपची युती होणार असल्याचं दोन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. पण या दोन्ही पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजूनही ठरलेला नाही. त्यातच भाजपकडून कल्याण-डोंबिवलीच्या ४ मतदारसंघातल्या इच्छुकांच्या मुलाखती सुरु झाल्या आहेत. या ४ मतदारसंघात भाजपचे एकूण २२ जण इच्छुक आहेत. यातले सर्वाधिक १० इच्छुक उमेदवार कल्याण पश्चिम मतदारसंघातून तर सगळ्यात कमी २ इच्छुक उमेदवार डोंबिवलीमधून इच्छुक आहेत. कल्याण ग्रामिणमधून ७ उमेदवार तर कल्याण पूर्वमधून ३ उमेदवार इच्छुक आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या ४ विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या डोंबिवलीत मुलाखती घेण्यात आल्या. प्रदेश सचिव मकरंद देशपांडे यांनी इच्छुकांशी संवाद साधला.
'कल्याण डोंबिवलीसाठी २२ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्याबाबतचा अहवाल प्रदेश नेतृत्वाकडे सोपवण्यात आल्यानंतर पक्षनेतृत्व ठरवेल, त्या उमेदवाराची घोषणा केली जाईल. गणपतीनंतर शिवसेनेसोबत जागावाटपाची चर्चा होणार आहे. ही स्वबळाची तयारी नसून आमच्या मित्रपक्षालाही याचा फायदा होऊ शकते', असं मकरंद देशपांडे यांनी सांगितलं.
कल्याण पश्चिमेत विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्यासह तब्बल १० जण इच्छुक आहेत. त्यामध्ये भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र या सर्वांना मागे सारून पुन्हा विद्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली जाते, का पक्षनेतृत्व काही वेगळा विचार करते हे लवकरच स्पष्ट होईल.