आठवणींची शाळा भरते तेव्हा... 1954 ची SSC बॅचच्या Get- together चा Video पाहून तुम्हालाही आठवतील ते दिवस

Viral School Video : शाळेचे दिवस जेव्हाकेव्हा आठवतात तेव्हातेव्हा आपण त्या दिवसांना आठवून उगाचच एका वेगळ्या दुनियेत निघून जातो. तिथं जिवाभावाचे मित्रमैत्रिणी भेटतात आणि एकच कल्ला होतो..   

सायली पाटील | Updated: Jun 12, 2023, 04:37 PM IST
आठवणींची शाळा भरते तेव्हा... 1954 ची SSC बॅचच्या Get- together चा Video पाहून तुम्हालाही आठवतील ते दिवस  title=
(छाया सौजन्य- व्हिडीओ स्क्रीनग्रॅब)/ Viral Video Reunion Of Class 10th Students From 1954 Batch in Pune the smiles and happiness

Viral Video : शाळा...फक्त उल्लेख जरी केला तरीही या वास्तूमध्ये घालवलेला प्रत्येक दिवस, असंख्य खोड्या, मित्रमैत्रिणींसोबतच्या गप्पा आणि शिक्षकांचा ओरडा आठवतो. ही एक अशी वास्तू आहे जिथं आपण प्रवेश केल्यापासून ते अगदी शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत बऱ्याच गोष्टी अगदी जशाच्या तशा आठवत असतात. अनेकदा ते दिवस आठवून नकळतच पापण्याही ओलावतात. जेव्हा आपण घरातल्या बच्चेकंपनीला शाळेत जाताना पाहतो तेव्हाही नकळतच आपल्या शाळेच्या आठवणीत नव्यानं हरवून जातो. अशा या शाळेची एखादी आठवण तुम्हीही सर्वांनाच सांगता ना? (Viral Video Reunion Of Class 10th Students From 1954 Batch in Pune the smiles and happiness )

एकाएकी शाळा आणि शाळेतील आयुष्याबाबत चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये काही वयोवृद्ध मंडळी 'किसी की मुस्कुराहटों पे हो निसार....' या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. त्यांच्याकडे पाहता अगदी सहजपणे त्यांच्या वयाचाही अंदाज लावता येत आहे. या मंडळींसाठी हे त्यांच्या काळातीलच सुपरहिट गाणं आहे असंच म्हणावं लागेल. कारण ही मंडळी इथं एका Get- together च्या निमित्तानं भेटली आहेत. हे आहे 1954 या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या बॅचचं स्नेहसंमेलन. 

नेटकरी एका क्षणात भावूक... 

1954 च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेसलन असंच कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आणि त्या कॅप्शननंच अनेकांच्या डोळ्यात आनंद आणि समाधान पाहायला मिळालं. इतक्या वर्षांनंतरही शाळेतली नाती जपत या मंडळींचं एकत्र येणं आणि पुन्हा तेच दिवस जगणं हे सर्वकाही पाहताना नेटकऱ्यांनाही त्यांची शाळा आठवली. 

अनेकांनीच हा व्हिडीओ त्यांच्यात्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर शेअर केला, कोणी तो वारंवार पाहिला तर कोणी 'ए तू पण उतारवयात असाच असशील किंवा अशीच असशील' असं म्हणत आपल्या मित्रमैत्रिणींची गोड खोडीही काढली. या व्हिडीओच्या निमित्तानं का असेना शाळेतील शिक्षण, मधली सुट्टी, अभ्यास आणि कल्ला पुन्हा एकदा मनाच्या कोपऱ्यात डोकावून गेला.