मुंबई : विधानसभेत आज प्रश्न होता तो शेत वीज पंपांचा. राज्यात कृषी ग्राहकांना रात्रीच वीज पुरवठा होत असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. याला ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उत्तर देताना सांगितलं, शेतकऱ्यांना अखंडित वीजेसाठी गेल्या सरकारने जे नियोजन केलं होतं. त्यावर आम्ही काम करत आहोत.
शेतकऱ्यांच्या वीजबिलांची दुरुस्ती होणार आहे. ज्यांना बिल जास्त येतात, त्याची तपासणी केली जाणार आहे, शेतकऱ्यांचे यापुढे हाल होणार नाहीत अशी उत्तरे मंत्र्यांनी दिली.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विजेची चर्चा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर नेली. त्यांनी कर्जमाफीवरून सरकारवर टीका केली. सरकारने जाहीर केलेली रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०१६ मध्ये राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. त्याची मदत अजून अनेकांना मिळाली नाही असे सांगत अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर टीका केली.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी होऊन खाते क्लिअर झाले आहे. मात्र, त्यांना पुन्हा अर्ज मिळत नाही अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासंदर्भात आढावा बैठक घेऊन या समस्येवर चर्चा करून प्रश्न सोडविला जाईल, असे सांगितलं.
भाजप आमदार सुधीर मुंनगंटीवार यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार मदत करण्याची घोषणा राज्य सरकारने केलीय. पण, राज्य सरकारने त्यांच्याबाबत काहीच केलं नाही. हवं तर, अर्थसकंल्पात अन्य बाबी कमी करा पण, आरोग्य आणि शेती या दोन गोष्टीना अधिक निधीची तरतूद करा अशी मागणीवजा सूचना केली.
माजी अर्थमंत्री सुधीर मनगटावर यांच्या या सूचनेवर आजी अर्थमंत्री अजित पवार यांनी Suggestion for action इतकंच उत्तर दिलं.