Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर आला आहे. मराठा आरक्षणाचे विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांकडून मंजूरी मिळाली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आला. सरकारच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. शैक्षणिक आणि नोकरी साठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सररकाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु कोणत्या ठिकाणी नोकरी देण्यात येणार हे देखील सरकार कडून सांगितले तर सोन्यावरून पिवळे होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा समाजाला सध्या देण्यात आलेले हे आरक्षण कोर्टात टिकले पाहिजे अस देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. संभाजीराजेंनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आधी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने राज्य मागासवर्ग आयोग गठित करून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे, ही मागणी घेऊन मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. शासनाने ही मागणी मान्य करत मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून मराठा समाजास आरक्षण लागू केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक ! अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून हे आरक्षण न्यायालयात टिकविण्याची जबाबदारी देखील शासनाने कटाक्षाने पार पाडावी.
सरकारनं मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झालं असलं तरी मनोज जरांगे मात्र आंदोलनावर ठाम आहेत. या विधेयकानं मराठा समाजाचं कल्याण होणार नाही आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षणच द्या, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. सगेसोय-यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे आग्रही आहेत. आपलं आंदोलन सुरूच राहिल अशी घोषणाही त्यांनी केलीय. सरकारचा निषेध म्हणून त्यांनी सलाईनही काढून टाकले. आता पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी उद्या मराठा बांधवांची अंतरवाली सराटीत बैठकही बोलावलीय.