ठाकरे सरकारमध्ये कोणाकोणाची लागणार मंत्रिपदी वर्णी?

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण असेल?

Updated: Dec 23, 2019, 04:36 PM IST
ठाकरे सरकारमध्ये कोणाकोणाची लागणार मंत्रिपदी वर्णी? title=

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एकूण ३६ मंत्री उद्या शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता दुसरा गिअर टाकणार आहे. मुख्यमंत्र्यांसह ७ मंत्र्यांचा शपथविधी गेल्या २८ नोव्हेंबरला पार पडला होता. नागपूर अधिवेशनात या ७ मंत्र्यांनीच राज्यकारभार चालवला. मात्र मंगळवारपासून खऱ्या अर्थानं राज्य सरकार कामाला लागणार आहे. कारण ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे.

या विस्तारात शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेतील. त्यात १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ मंत्री शपथ घेणार आहेत. त्यात १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री शपथ घेणार आहे. तर काँग्रेसचेही १० मंत्री शपथ घेणार असून यात ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आलं आहे. नव्या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित होणार का, याकडं सगळ्याचं लक्ष लागलं आहे. या पदासाठी अजित पवार यांचं नाव चर्चेत असलं तरी शरद पवार काय निर्णय घेतात, याची उत्सूकता आहे.

राष्ट्रवादी

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मश्रीफ, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील, सरोज अहिरे आणि डॉ. किरण लहामटे यांच्या नावाचा समावेश आहे.

काँग्रेस

काँग्रेस मंत्र्यांची अंतिम यादी नवी दिल्लीत निश्चित होते आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांच्यासह
विजय वडेट्टीवार, के सी पाडवी, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार, वर्षा गायकवाड, अमिन पटेल आणि प्रणिती शिंदे यांचा संभाव्य मंत्र्यांमध्ये समावेश आहे.

शिवसेना

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कुणाकुणाची वर्णी लागते, याचीही चर्चा रंगली आहे. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये रविंद्र वायकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, आशिष जैस्वाल, संजय राठोड, दादा भुसे, दिवाकर रावते, अनिल परब, डॉ. राहुल पाटील, संजय शिरसाट, अनिल बाबर आणि शंभूराज देसाई-पाटण यांचा समावेश आहे.

त्यामुळं नव्या वर्षात महाराष्ट्राचा कारभार नव्या टीमकडं असणार आहे. कॅप्टन उद्धव ठाकरे आता आपल्या टीममध्ये कुणाचा समावेश करतात, याचीच उत्सूकता आहे.