वाल्मिक जोशी, जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड गाजत असलेल्या जळगाव महापालिकेच्या महापौरपदी सौ. जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची आज निवड करण्यात आली. शिवसेनेने ही ग्रँड फाईट ४५ विरूध्द ३० अशा फरकाने जिंकली. यामुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे.
महापालिकेत भाजपला असणारे भक्कम बहुमत पाहता महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोधी होण्याची शक्यता होती. पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी या पदांसाठी अर्ज घेतांना देखील असाच दावा केला होता. अर्थात, दोन्ही पदांसाठी नवनवीन नावे समोर आल्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली. यातच पाच दिवसांपूर्वी भाजपमध्ये उभी फूट पडण्याचे संकेत मिळताच खळबळ उडाली. शिवसेनेने असंतुष्ट भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील आणि इतरांच्या मदतीने भाजपला हादरा दिला. भाजपने यासाठी डॅमेज कंट्रोल करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
काल शिवसेनेतर्फे महापौरपदासाठी सौ. जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदीासाठी कुलभूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने पहिल्यांदा दोन उमेदवार उतारण्याचे संकेत दिले तर रात्री उशीरा या दोन्ही पदांसाठी अनुक्रमे प्रतिभा कापसे आणि सुरेश सोनवणे यांना उमेदवारी दिली. मात्र शिवसेनेकडे असणारे भक्कम बहुमत पाहता त्यांच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात होता. आज नेमके तेच घडले.
आज सकाळी अकरा वाजेपासून महापौर आणि उपमहापौर पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली. यानिमित्त आयोजीत बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत होते. तर व्यासपीठावर आयुक्त सतीश कुलकर्णी यांची उपस्थिती होती. दरम्यान, मतदान होण्याआधी सभागृहात मोठा गदारोळ झाला. भाजपने पहिल्यांदा शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेत त्यांना रद्द करण्याची मागणी केली. मात्र ही मागणी पीठासीठ अधिकारी जिल्हाधिकारी राऊत यांनी फेटाळून लावली.
निवड प्रक्रिया सुरू असतांना स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी ही ऑनलाईन सभा बेकायदेशीर असून भाजप याच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली. ही निवड निवडणूक अधिनियम २००५ च्या प्रमाणे होत नसल्याने आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी प्रत्येक उमेदवारांची खातरजमा करून त्यांनी या दोन्ही पदांसाठी नेमके कुणाला मत दिले याची माहिती जाणून घेतली. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर महापौरपदी सौ. जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदावर कुलभूषण पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली.
शिवसेनेने ही ग्रँड फाईट ४५ विरूध्द ३० अशा फरकाने जिंकली.या माध्यमातून जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर भाजपला अतिशय भक्कम बहुमत असतांनाही त्यांच्या हातून महापालिका गेली आहे.