नाथाभाऊंचा एक फोन आणि जळगाव महापालिकेत शिवसेनेला सत्ता

पण हे सत्तांतर कसं घडलं, याचा पहिल्यादिवसापासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम खाली देत आहोत.

Updated: Mar 18, 2021, 02:10 PM IST
नाथाभाऊंचा एक फोन आणि जळगाव महापालिकेत शिवसेनेला सत्ता title=

वाल्मिक जोशी, झी २४ तास, जळगाव : जळगाव महापालिकेत सत्तांतर झालं आहे, शिवसेनेच्या जयश्री महाजन ४५ मतांनी जळगाव महापालिकेच्या महापौरपदी आल्या आहेत. शिवसेनेने भाजपाकडून महापालिकेची सत्ता आपल्याकडे खेचून घेतली आहे. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर हे सत्तांतर अपेक्षित होतं. पण हे सत्तांतर कसं घडलं, याचा पहिल्यादिवसापासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम खाली देत आहोत.

नाथाभाऊंचा मुख्यमंत्र्यांना तो एक फोन

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते एकनाथरावजी खडसे यांनी 8-10 दिवसांपूर्वी काही कामानिमित्त मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना फोन केला, फोनवर चर्चा करत असतांना नाथाभाऊंनी जळगाव शहरात रस्त्यांची झालेली दूरवस्था, रखडलेले विकास काम याबद्दल माहिती मुख्यमंत्र्यांना दिली, त्याचप्रमाणे आपण राज्याचे प्रमुख या नात्याने जळगाव शहराकडे लक्ष देऊन शहराच्या विकासाला लागलेल ग्रहण सोडवावं अशी विनंती केली.

जळगावचे रस्ते आणि नगरसेवकांची नाराजी

यावर मुख्यमंत्र्यांनी जळगाव मनपाच्या निवडणुकीला किती अवधी आहे, अशी विचारणा नाथाभाऊंना केली. निवडणुकीस अडीच वर्ष बाकी आहे, परंतु येणाऱ्या 15  दिवसात महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया होणार आहे. 

आपल्या संपर्कात भाजपाचे 22-25 नगरसेवक आहे, त्यांची सत्ताधारी पक्षाविषयी प्रचंड नाराजी आहे आणि शहराच्या विकासाकरीता बदल व्हावा, असे मत देखील त्यांनी नाथाभाऊंनी व्यक्त केले आहे. तसेच जळगाव शहर विकास कामांना गती यावी म्हणून शिवसेनेचा महापौर होणार असेल, तर मी यात मदत करु शकेल, असं नाथाभाऊंनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी

मुख्यमंत्र्यांनी विनायक राऊतांशी चर्चा करुन तुम्ही ठरवा, असे सांगितले त्यानंतर काही वेळातच विनायक राऊत यांनी नाथाभाऊंना फोन करुन सत्तांतराबाबत चर्चा केली, त्यानंतर, उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी सोपवली आणि त्यानुसार एकनाथ शिंदे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये संवाद झाला.

रात्री उशीरा नाथाभाऊंची भेट

संवादा दरम्यान महापौर शिवसेनेचा आणि उपमहापौर फुटीर नगरसेवकांमधून नाथाभाऊ निर्णय घेतील असं ठरलं. 4-5 दिवसांपूर्वी सुनील खडके आणि त्यांच्या संपर्कात असलेले 10-12 नगरसेवकांनी मुक्ताईनगर येथील खडसे फार्म हाऊसवर रात्री उशीरा नाथाभाऊंची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

पक्षांतर बंदी कायद्याची जाणीव

जळगावच्या विकासासाठी सत्तांतर करण्याकरीता पुढाकार घ्यावा, आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली सत्तांतर करु असा विश्वास दिला, यावेळी खडसेंनी उपस्थित नगरसेवकांना पक्षांतर बंदी कायद्याची जाणीव सर्वांना करुन दिली, त्यामुळे याचा विचार करावा असे सांगितले.

सदस्यत्व गेलं तरी चालेल पण

परंतु नगरसेवकांनी नाथाभाऊ नेतृत्व करावं आमचे सदस्यत्व गेलं तरी चालेल पण शहराच्या विकासाकरता महानगरपालिकेत तुमच्या नेतृत्वाची गरज असल्याचे सुर काढले, त्यानंतर नाथाभाऊंनी नगरसेवकांच्या इच्छानुसार सत्तांतराचा विडा हाती घेतला.

शिवसेनेचे 15  आणि एम.आ.एम.च्या ३ नगरसेवक

बघता बघता नगरसेवकांची संख्या 22 वर येऊन पोहचली. तसेच शिवसेनेच नगरसेवक सुनील महाजन यांनी नाथाभाऊंना भेटण्याकरीता रात्री एकांतात भेट घेतली, त्यावेळी सुनिल महाजन यांनी महापौरपदाकरीता त्यांच्या पत्नी जयश्री महाजन यांना महापौरपद द्यावं, त्याकरीता शिवसेनेचे 15  आणि एम.आ.एम.च्या ३ नगरसेवक यांची संमती आहे.

आपण शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांशी बोलून माझ्या पत्नीच्या महापौरपदाकरता शिफारस करावी अशी विनंती केली. त्यानंतर नाथाभाऊंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे, विनायक राऊत या नेत्यांशी चर्चा केली, यावेळी महापौर पदाकरता जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर पदाकरता सुनील खडके यांच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.

त्यानंतर सर्व नगरसेवकांची व्यवस्था ही शिवसेना करेल असे ठरलं आणि त्यामुळे शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांनी सुचवल्याप्रमाणे मनपा सत्तांतराकरता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव मनपाचे खडसे समर्थक नगरसेवकांसोबत शिवसेना आणि एम.आय.एम.च्या नगरसेवकांना पाठवण्यात आले. सर्व नगरसेवक मुंबईकडे रवाना करण्यात आले.

मराठा समाजाला संधी द्यावी

नंतर 2 दिवसांपूर्वी खडसे देखील मुंबईत दाखल झाले आणि शिवसेना नेते तसेच एकनाथ खडसे यांच्यात 2-3 वेळा चर्चा झाली. यावेळी जळगाव शहरातील सामाजिक गणितानुसार उपमहापौरपद सुनिल खडकेंना न देता मराठा समाजाला संधी द्यावी आणि स्थायी समितीचं सभापती पद सुनील खडकेंना देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अन्य शिवसेना नेत्यांनी दिलेल आहे.

नगरसेवकांची ही संख्या 45 च्या वर जाऊन पोहोचली

आजतागायत सत्तांतराकरीता लागणारी नगरसेवकांची ही संख्या 45 च्या वर जाऊन पोहचली आहे. एकनाथ खडसे यांनी जळगावच्या विकासाकरता उचलेला सत्ता परीवर्तनाचा विड्यातून मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने जळगाव मनपात सत्तांतर घडणार हे निश्चित होतं त्यातून जळगावचा विकास होईल, असं एकनाथ खडसेंसह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.