2700000000 एवढे पैसे रोज दान करतात; भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती, जगातील सर्वात मोठा दानशूर

Richest Muslim Family In India: भारतातील एक उद्योगपती दिवसाला 27 कोटी रुपये दान करतो. हा उद्योगपती भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपतींपैकी एक आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 24, 2025, 04:25 PM IST
2700000000 एवढे पैसे रोज दान करतात; भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती, जगातील सर्वात मोठा दानशूर

Azim Premji Richest Muslim Businessman In India : भारतात अनेक बडे उद्योपती आहेत. हे उद्योगपती मोठ्या प्रमाणात दान धर्म करतात. मात्र, भारतात असे उद्योगपती आहेत ज्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती आणि जगातील सर्वात मोठा दानशूर व्यक्ती अशी त्यांचे ओळख आहे. भारतातील हा सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती दिवसाला 27 कोटी रुपये दान करतो. 

अझीम प्रेमजी हे  भारतातील हा सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती  आहेत. अझीम प्रेमजी हे   भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि विप्रो लिमिटेड या कंपनीचे संस्थापक आहेत. कोरोना काळात मदत करणाऱ्या जगभरातील दानशुरांच्या यादीत भारताचे अझिम प्रेमजी दुसऱ्या स्थानावर होते. त्यांनी कोणताही विचार न करता आपली तब्बल 22 अब्ज डॉलर्सची संपत्ती  समाजकार्यासाठी दान केली होती. यामुळे जगभर यांच्या दानशूरपणाटी चर्चा रंगली होती. अझीम प्रेमजी हे दिवसाला 27 कोटी रुपये दान करतात.

प्रेमजी कुटुंब हे देशातील सर्वात यशस्वी मुस्लिम व्यावसायिक कुटुंब आहे. तीन पिढ्यांपासून व्यावसायिक श्रेत्रात त्यांचा दबदबा आहे. सध्या अझीम प्रेमजी त्याचे नेतृत्व करत आहेत. वडिलांच्या निधनानंतर, त्यांनी विप्रोची जबाबदारी स्वीकारली. विप्रो कंपनीला त्यांना आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवून दिले. 

1947 मध्ये जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी अझीम प्रेमजींचे वडील मोहम्मद प्रेमजी यांना पाकिस्तानात येऊन तेथील अर्थमंत्री होण्याचा प्रस्ताव दिला होता. पण मोहम्मद प्रेमजींनी भारतात राहून आपला व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे प्रेमजी कुटुंब भारतातील सर्वात समृद्ध मुस्लिम व्यावसायिक कुटुंब बनले.

अझीम प्रेमजी यांचा जन्म 1945 मध्ये मुंबईत झाला. त्यांचे वडील मोहम्मद प्रेमजी तेल व्यवसायात होते. म्यानमारमध्ये ते व्यवसाय करायचे. पण 1940 च्या दशकात ते भारतात स्थलांतरित झाले. 1965 मध्ये त्यांचा मोठा मुलगा फारुख प्रेमजी पाकिस्तानला गेला, परंतु अझीम प्रेमजींनी भारतात राहून वडिलांचा वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

वडिलांच्या निधनानंतर, अझीम प्रेमजी यांनी वडिलांचा व्यवसाय सांभाळला. त्यांनी तेल व्यवसाय यशस्वीरित्या पुढे नेला, पण याशिवाय त्यांना काहीतरी नवीन करण्याची इच्छाही होती. 1977 मध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीचे नाव बदलून विप्रो केले आणि आयटी क्षेत्रात पदार्पण केले.

1980 च्या दशकात भारतात संगणक आणि तंत्रज्ञान विकसित होत होते. भविष्यात आयटीचे महत्त्व समजून, अझीम प्रेमजींनी विप्रो या आयटी कंपनीची स्थापना केली. आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारी करत त्यांनी विप्रोला भारतातील सर्वोच्च आयटी कंपन्यांपैकी एक बनवले. आज विप्रो ही जगातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे. विप्रो कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 3 ट्रिलियन इतके आहे.

अझीम प्रेमजी हे केवळ भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती नाहीत तर त्यांची गणना देशातील सर्वात मोठ्या दानशूर व्यक्तींमध्ये देखील केली जाते. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती 12.2 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1 लाख कोटी रुपये आहे. हुरुन इंडिया फिलँथ्रॉपी लिस्टनुसार, अझीम प्रेमजी यांनी 2021 मध्ये 9,713 कोटी रुपये दान केले. जर आपण ते दररोज मोजले तर ते दररोज 27 कोटी रुपये इतके होतात.