Today In History : छत्रपती संभांजी महाराजांचं निधन... राजाराम राजेंचं रायगडाबाहेर पडणं अन् जिंजीचा प्रवास

छत्रपती राजाराम राजे यांची आज जयंती. राजाराम राजे यांनी मराठ्यांचं साम्राज्य जिंजीपर्यंत कसं पसरवलं? आजच्या Today in History मध्ये जाणून या हा इतिहास. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 24, 2025, 03:45 PM IST
Today In History : छत्रपती संभांजी महाराजांचं निधन... राजाराम राजेंचं रायगडाबाहेर पडणं अन् जिंजीचा प्रवास

सध्या सगळीकडेच छत्रपती संभाजी महाराजांची चर्चा आहे. पण महाराजांच्या निधनानंतर राजाराम राजे यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. आजच्या दिवशी म्हणजे 24 फेब्रुवारी 1670 रोजी  राजाराम राजे यांचा रायगडावर जन्म झाला. आज Today in History मध्ये छत्रपती राजाराम राजे यांची जिंजी पर्यंतचा प्रवास पाहणार आहोत. 

औरंगजेबाच्या मुघली छावणीत छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत क्रूर अशी हत्या करण्यात आली. यावेळी औरंगजेबाला वाटलं की, आपण मराठ्यांचा छत्रपती हिरावून घेतला पण तसं झालं नाही. संभाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे येसुबाईंनी महाराजांना मंचकारोहण करुन त्यांना 'छत्रपती' म्हणून घोषित केले आहे. यानंतरही मुघल काही शांत बसले नाहीत. यानंतरही मराठे आणि मुघल यांच्यात युद्ध सुरुच राहिले. 

महाराजांचे संपूर्ण कुटुंब यावेळी रायगडावर होते. कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र राहणे धोक्याचे होते. म्हणून राजाराम महाराजांनी आपल्या सहकार्‍यांसह गडाबाहेर पडावे. वेगवेगळे किल्ले फिरत शत्रूंचा प्रतिकार केला. त्यातूनही बिकट 
परिस्थिती उद्भवली, तर जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात जिंजीकडे निघून जावे, असे येसूबाईंनी सांगितले होते. 

(हे पण वाचा - छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ कशी आहे? पाहा भोसले घराण्याचा इतिहास) 

असा होता राजाराम राजेंचा प्रवास 

राजाराम महाराज रायगडाबाहेर पडून प्रतापगडास आले. प्रतापगडाहून सज्जनगड, सातारा, वसंतगड असे करत पन्हाळ्यास पोहोचले. राजाराम राजे जेथे जेथे गेले तेथे मुघलांनी फौज फाट्यासह त्यांचा पाठलाग केला. पन्हाळ्यासही मोगलांचा वेढा पडला. स्वराज्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट बनू लागली. तेव्हा पूर्वनियोजित मसलतीप्रमाणे राजाराम महाराजांनी आपल्या प्रमुख सहकार्‍यांनिशी जिंजीकडे जाण्याचा निर्णय घेतला.

औरंगजेबाचा निश्चय 

काहीही करुन मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करण्याचा चंगच बांधला होता. त्यामुळे औरंगजेबाने राजाराम राजेंचा पाठलाग काही सोडला नाही. राजे महाराष्ट्रातून निसटून जिंजीकडे जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज औरंगजेबाने बांधला होता. त्यानुसार समुद्रमार्गाने राजा पळून जाईल या दृष्टीने गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयलाही लक्ष ठेवण्यास सांगितले होते. मुघलांनी वेगवेगळ्या पद्धतीने राजाराम राजे यांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 

अशी घेतली बहिणीची मदत 

संभाजीराजांच्या काळात हरजीराजे महाडीक हा कर्नाटकातील मराठ्यांचा मुख्य सुभेदार होता. त्याचे नुकतेच निधन झाले होते. त्यांची बायको, म्हणजे राजाराम महाराजांची सावत्र बहीण. हरजीराजांच्या मागे तिचा स्वतंत्र होण्याचा उद्योग चालू होता. तिने जिंजीचा किल्ला साधनसंपत्तीसह बळकावला होता. आता तिने महाराजांना विरोध करायचे ठरवून तशी सिद्धता चालू केली. ‘किल्ला आपल्या स्वाधीन करावा’, हा महाराजांचा निरोप तिने धुडकावून लावला. एवढेच नव्हे, तर त्यांना लष्करी प्रतिकार करण्यासाठी ती आपले सैन्य घेऊन जिंजीबाहेर पडली; पण काही अंतर गेल्यावर तिच्याच सैन्यातील अधिकार्‍यांनी तिला त्या अविचारापासून परावृत्त केले. शेवटी आपली बाजू दुर्बळ झाल्याचे पाहून निरुपायाने ती किल्ल्यात परतली. जिंजीतील मराठ्यांनी राजाराम महाराजांचा पक्ष उचलून धरला. परिणामी अंबिकाबाईस आपल्या बंधूच्या स्वागतासाठी जिंजीचे द्वार उघडावे लागले. नोव्हेंबर 1689 च्या पहिल्या आठवड्यात राजाराम महाराज आपल्या सहकार्‍यांनिशी जिंजी किल्ल्यात आले. जिंजीचा प्रवास असा सुखान्त झाला.

 जिंजीत मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व 

मराठा मंडळींनी कर्नाटकात आणि जिंजीत राजाराम महाराजांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केल्याने मद्रास किनारपट्टीवरील राजकारणाचे रंग पालटू लागले. नव्या मराठा राजाने जिंजीत आपली नवी राजधानी उभी केली. दरबार सज्ज झाला. मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ झाले. संताजी, धनाजी अशा अनेक प्रभृतींनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी निकराची झुंज देणे आणि नंतर महाराजांनी महाराष्ट्रात येऊन मोगलांविरुद्ध मोठी धामधूम माजवणे. पुढे जिंजी जिंकून राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानास धाडले. खिस्ताब्द 1690 या वर्षी खानाने जिंजीस वेढा दिला तो 8 वर्षे चालू राहिला. त्या काळात रामचंद्र पंडित, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी प्रभृतींनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी निकराची झुंज दिली. संताजी-धनाजींनी याच काळात गमिनी काव्याने लढून मोगलांची हैराणगत केली. नाशिकपासून जिंजीपर्यंत मराठ्यांच्या फौजा सर्वत्र संचार करू लागल्या. शेवटी खिस्ताब्द 1697 या वर्षी जुल्फिकार खानाने जिंजी जिंकली खरी; पण तत्पूर्वीच महाराज किल्ल्यातून निसटले. महाराष्ट्रात येऊन त्यांनी मोगलांविरुद्ध मोठी धामधूम माजवली. शत्रूच्या प्रदेशावरील स्वारीत असतांनाच त्यांचा प्रकृतीने घात केला आणि सिंहगडावर फाल्गुन कृ. नवमी, शके १६२१ या दिवशी त्यांचे निधन झाले.