Shoaib Akhtar on Babar Azam: चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारताने पराभूत केल्यानंतर माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे. शोएब अख्तरने बाबर आझमवर सडकून टीका केली असून, त्याला बोगस म्हटलं आहे. तो सुरुवातीपासूनच फार बनावट आहे असा गंभीर आरोप शोएब अख्तरने केला आहे. "आपण नेहमीच बाबर आझमची विराट कोहलीशी तुलना करतो. आता मला सांगा हिरो कोण आहे? सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने 100 शतकं केली आहेत. आता विराट सचिन तेंडुलकरचा महान वारसा पुढे नेत आहे," असं शोएब अख्तरने त्याचा शो 'गेम ऑन है' मध्ये म्हटलं आहे.
पुढे त्याने म्हटलं आहे की, "बाबर आझमचा हिरो कोण आहे? टुक टुक", असा टोला शोएब अख्तरने लगावला. यावेळी त्याने कोणाचंही नाव घेतलं नाही. "तुम्ही चुकीच्या हिरोंना आपले आदर्शन मानत आहात. तुमची विचार प्रक्रिया चुकीची आहे. तू सुरुवातीपासून लबाड माणूस होतास," असा संताप शोएब अख्तरने व्यक्त केला आहे.
"माझी तर पाकिस्तान संघाबद्दल बोलण्याची इच्छाही नाही. फक्त मला पैसे दिले जात आहेत म्हणून मी हा शो करत आहे," असंही त्याने शोमध्ये जाहीरपणे सांगितलं. "ही वेळेची बदनामी आहे. 2001 पासून मी संघाची घसरण होताना पाहत आहे. मी अनेक कर्णधारांसह खेळलो आहे, ज्यांचं व्यक्तिमत्व दिवसातून तीनदा बदलत असे," असंही त्याने म्हटलं.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करल्यानंतर, रविवारी दुबईमध्ये भारतानेही पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. अख्तरने भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीचं कौतुक केलं.
“आपण हे भूतकाळात पाहिलं आहे. जेव्हा तुम्ही विराट कोहलीला पाकिस्तानविरुद्ध खेळायचं आहे सांगता तेव्हा तो शतक करतो. त्याला माझा सलाम आहे. तो एका सुपरस्टारसारखा आहे! तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करणारा खेळाडू आहे! आधुनिक काळातील महान खेळाडू! त्याच्याबद्दल काही शंका नाही. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे. तो सर्व कौतुकास पात्र आहे,” असं अख्तर म्हणाला.
शोएब अख्तरने पाकिस्तान व्यवस्थापनावरही टीका केली आहे. “भारताविरुद्धच्या पराभवामुळे मी अजिबात निराश नाही कारण मला माहित होते की काय होणार आहे. तुम्ही पाच गोलंदाज निवडू शकत नाही. संपूर्ण जग सहा गोलंदाज खेळवत आहे. तुम्ही दोन अष्टपैलू खेळाडूंसह जाता पण हे फक्त बुद्धीहीन आणि अज्ञानी व्यवस्थापन आहे. मी खरोखर निराश झालो आहे,” असं शोएब अख्तरने एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.