कौतुकास्पद! 'मला असा बॉस नकोय जो...'; Interview मध्ये सिलेक्ट झाल्यानंतर तिनेच नाकारली नोकरी

Woman Rejects Job: मुलाखतीला उशीरा पोहचल्याने नोकरी गेल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल पण एका महिलेने मुलाखत घेणारी व्यक्ती उशीरा आल्याने नोकरी नाकारल्याचा प्रकार घडलाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 24, 2025, 02:11 PM IST
कौतुकास्पद! 'मला असा बॉस नकोय जो...'; Interview मध्ये सिलेक्ट झाल्यानंतर तिनेच नाकारली नोकरी
उमेदवार महिलनेच दिली माहिती

Woman Rejects Job: सामान्यपणे नोकरी हवी म्हणजे आधी मुलाखत देणं आलं. अशा महत्त्वाच्या मुलाखतीला उशीरा पोहचल्याने मुलाखत देण्याची संधी न मिळताच नोकरी गमावल्याची अनेक उदाहरणं तुम्ही यापूर्वी ऐकली असतील किंवा त्याबद्दल वाचलं असेल. मात्र मुलाखत घेणाराच उशीरा आल्याने उमेदवारानेच नोकरी नाकारल्याचा एक अजब प्रकार समोर आला आहे. सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या 'रेडइट'वर एका महिला उमेदवाराने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार सांगितला आहे. ही महिला मुलाखत देण्यासाठी गेली होती. मात्र मुलाखत घेणारी व्यक्तीच नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटं उशीरा आल्याने या महिलेने आपल्यालाच या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा नसल्याचं सांगत मुलाखत देण्यास नकार दिला आहे.

ईमेलवरुन कळवलं नोकरी नको

निकोल नावाच्या महिलेने 45 मिनिटं उशीरा आलेल्या मुलाखतकार महिलेला मला तुमच्याकडे काम करण्याची इच्छा नाही असं सांगितलं. हे ऐकून समोरची महिला गोंधळून गेली होती असं निकोलने म्हटलं आहे. "मला ही नोकरी मिळाली होती. मात्र मीच कंपनीची ऑफर नाकारली. मी पाठवलेला हा ईमेल पाहा.  मला हा ईमेल पाठवताना अवघडल्यासारखं झालं होतं कारण ही महिला माझ्या जोडीदाराला ओळखते," असं म्हणत निकोलने तिने पाठवलेल्या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. 

महिलेने पाठवलेल्या ईमेलमध्ये काय म्हटलंय?

"धन्यवाद तुम्ही मला प्रतिसाद दिल्याबद्दल. मी फार विचार केला. मी तुमच्या ऑफरबद्दल आभारी आहे. मात्र मला ही ऑफर नाकारावी लागणार आहे. मला हे सांगायला वाईट वाटतंय पण आपली कालची भेट माझ्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मला अपेक्षित होतं की तुम्ही वेळेत याल आणि आपण दोघांनी ठरवलेल्या वेळेत भेट होईल अशी अपेक्षा होती. मात्र तुम्ही केवळ उशीर केला असं नाही तर मी याबद्दल आक्षेप घेतला असता तुम्ही कारणं देत मुलाखत पुढे सुरु ठेवली. माझ्या बॉसमध्ये असे गुण असावेत असं मला वाटत नाही. आपण एकमेकींच्या जागी उभ्या राहिलो तरी तुम्ही जे वर्तन केलं ते तुम्हालाच पटणार नाही, यावर आपलं सहमत असेल यात शंका नाही," असं या महिलेने पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे. 

अनेकांनी नोंदवलं मत

अनेकांनी या पोस्टवर मतं नोंदवली आहेत. हा फारच धाडसी निर्णय असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र काहींनी आपल्याबरोबरही असं घडलं होतं मुलाखतीच्या वेळी. मात्र ती बॉस म्हणून फारच उत्तम असल्याचं म्हटलं आहे. काहींनी नोकरीची खरंच गरज असतील तर असं केलं नसतं अशी प्रतिक्रिया नोंदवली असली तरी नैतिकतेच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी या महिलेचं कौतुक केलं आहे. या महिलेने मुलाखत घेणाऱ्या महिलेला वक्तशीरपणाचा धडा शिकवल्याचं अनेकांनी या पोस्टवर केलेल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे.