दिल्लीच्या त्रिलोकपुरी येथून एक विवाहित जोडपं उत्तर प्रदेशच्या प्रयागराजला महाकुंभमध्ये सामील होण्यासाठी गेलं होतं. तिथे गेल्यानंतर पती उत्साह दाखवत पत्नीचे व्हिडीओ, फोटो काढून घरी असलेल्या मुलांना पाठवत होता. आपण येथे फार आनंदात फिरत असल्याचं तो दाखवत होता. यानंतर ते एका हॉटेलमध्ये रात्र घालवण्यासाठी थांबले होतं. पण सकाळी तिथे महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला.
18 फेब्रुवारीच्या रात्री शहरातील झुंसी परिसरात पत्नीच्या निर्घृण हत्येप्रकरणी प्रयागराज आयुक्तालय पोलिसांना प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आणि पतीला अटक करण्यासाठी 48 तास लागले.
19 फेब्रुवारीच्या सकाळी झुंसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आझाद नगर कॉलनीतील एका होमस्टेच्या बाथरूममध्ये 40 वर्षीय महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याची माहिती प्रयागराज पोलिसांना मिळाली. महाकुंभ उत्सवात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी येथे राहण्याची व्यवस्था केली जात होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता महिलेचा धारदार शस्त्राने गळा कापला असल्याचं उघड झालं.
अधिक चौकशी केली असता, महिला एका पुरुषासह आदल्या रात्री तिथे आल्याचं उघड झालं. त्यांनी एकमेकांची पती-पत्नी म्हणून ओळख करुन दिली होती. होमस्टेच्या मॅनेजरने त्यांची ओळख पडताळणी न करता किंवा ओळखीचा कोणताही पुरावा न घेता त्यांना एक खोली दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी, मॅनेजरला बाथरूममध्ये भयानक दृश्य दिसलं आणि त्याने ताबडतोब पोलिसांना कळवलं.
तपासात महिलेने 18 फेब्रुवारीच्या रात्री आपल्या पतीसह नवी दिल्ली ते प्रयागराज प्रवास केल्याचं उघड झालं. सोशल मीडियावर आणि वृतपत्रांच्या माध्यमातून महिलेचा फोटो व्हायरल करण्यात आला. या रणनितीला अखेर यश मिळालं आणि 21 फेब्रुवारीला महिलेचे नातेवाईक पुढे आले.
महिलेची ओळख मिनाक्षी आणि पतीची ओळख अशोक कुमार अशी पटली. ते दोघेही राजधानीतील त्रिलोकपुरी येथे वास्तव्यास होते. पेपरमध्ये फोटो पाहिल्यानंतर महिलेचा भाऊ परवेश कुमार त्यांची दोन मुलं अश्वनी आणि आदर्श यांच्यासह प्रयागराजसाठी रवाना झाला. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन महिलेची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी अशोक कुमारविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला.
चौकशीदरम्यान अशोक कुमारने गुन्ह्याची कबुली दिली. मागील तीन महिन्यांपासून मी पत्नीच्या हत्येचा कट आखत होतो असा खुलासा त्याने केला. पूर्व दिल्लीच्या त्रिलोकपुरी येथे वास्तव्यास असणारा स्वच्छता कर्मचारी अशोक याचे विवाहबाह्य संबंध होते. पत्नीला संपवण्यासाठी आणि विवाहबाह्य संबंध सुरु ठेवण्यासाठी त्याने कट आखला.
17 फेब्रुवारीलाअशोक महाकुंभ यात्रेच्या बहाण्याने मीनाक्षीसोबत दिल्लीहून निघाला. दुसऱ्या दिवशी ते झुंसीला पोहोचले आणि एका होमस्टेमध्ये खोली बुक केली. रात्र होताच दोघांमध्ये वाद झाला. मीनाक्षी बाथरूममध्ये गेल्यावर अशोकने फायदा घेत तिच्यावर मागून हल्ला केला आणि चाकूने तिचा गळा चिरला. त्यानंतर त्याने त्याचे रक्ताने माखलेले कपडे काढले, त्यात हत्येचे हत्यार गुंडाळले आणि गुप्तपणे पुरावे नष्ट केले.
संशय निर्माण करण्यासाठी, अशोकने नंतर त्याचा मुलगा आशिषला फोन केला आणि मीनाक्षी गर्दीच्या जत्रेत बेपत्ता झाल्याचा खोटा दावा केला. आपण तिचा शोध घेतला होता पण ती सापडली नाही असं सांगत त्याने काळजी वाटत असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला.
वडिलांच्या दाव्यावर संशय आल्याने, मीनाक्षीचा मुलगा अश्विनने प्रकरण स्वतःच्या हाती घेतलं. 20 फेब्रुवारी रोजी आईचा फोटो घेऊन महाकुंभात पोहोचला आणि तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुसरीकडे पोलीस पुरावे गोळा करत होते. जिथे मृतदेह सापडला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. 18 फेब्रुवारीला हत्येच्या एक दिवस आधी, अशोकने सोशल मीडियावर स्वतःचा आणि मीनाक्षीचा पवित्र स्नान करतानाचा व्हिडिओ अपलोड केला होता. यानंतर तपासाअंतर अशोकला अटक करण्यात आली.