Vishal Savane, Zee Media, Pandharpur Wari 2023: जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या 338 वा पालखी सोहळा सुरू आहे. वारकरी हरिमानाच्या गरज करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने सरसर मार्गस्त होत आहेत. संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्यात काटेवाडी इथं संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पहिलं मेंढ्यांचं गोल रिंगण संपन्न झालं. मात्र, काटेवाडीत का घातलं जातं मेंढ्यांचं रिंगण? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
सकाळी संत तुकाराम महाराज यांची पालखी बारामतीकरांचा पाहुणचार घेवून पंढरीकडे मार्गस्थ झाली. सकाळचा विसावा घेतल्यानंतर पालखी दुपारच्या सुमारास काटेवाडी इथं दाखल झाली. पालखी काटेवाडीत येताच. येथील परीट समाजाने धोतरांच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत केलं. यानंतर पालखी काटेवाडीत विसावली. पालखी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होण्यापूर्वी काटेवाडीत मेंढ्यांचे रिंगण ही संपन्न झालं. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ काटेवाडी मध्ये एकवटले होते.
काटेवाडी येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण घालण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. काही वर्षांपूर्वी या परिसरात मेंढ्यांमध्ये साथीचा रोग आला होता. त्यामुळे अनेक मेंढ्या मृत्युमुखी पडत होत्या. दरम्यान याच सुमारास संत तुकाराम महाराज यांची पालखी या गावांमध्ये आली आणि येथील मेंढपाळ यांनी पालखीला मेंढ्यांचे रिंगण घालून साथीचा रोग नष्ट होण्याची प्रार्थना केली. त्यानंतर हा रोग येथून नष्ट झाल्याची भावना आहे. म्हणून जेव्हा संत तुकाराम महाराज यांची पालखी या गावात येते तेव्हा पालखीला मेंढ्यांचे रिंगण घातलं जातं.
या रिंगणाखेरीजही काटेवाडीत संत तुकोबारायांच्या पालखीचं अनोखं स्वागत करण्याची परंपरा आहे. परीट पायघड्या अशी या परंपरेची ओळख आहे. पालखीचं काटेवाडीत स्वागत करताना इथले परीट समाजातल्या व्यक्ती या पालखीच्या मुख्य मार्गावर धोतराच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करतात. हा सोहळाही अत्यंत रमणीय असा असतो. ही परंपराही कित्येक वर्ष जुनी परंपरा आहे.
दरम्यान, काटेवा़डीत या दोन महत्वाच्या गोष्टी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान पहायला मिळतात. पालखीचं अशा पद्धतीने केलं जाणारं स्वागत आणि त्यानंतर रंगणारा मेंढ्यांचा रिंगण सोहळा एकमेवाद्वितीय असा आहे.