Mumbai Train Firing: मुंबई ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबाराने हादरली आहे. रेल्वे पोलीस कर्मचारी चेतन सिंह याने आपल्या एका वरिष्ठ अधिकारी आणि तीन प्रवाशांची जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळ्या घालून हत्या केली. दरम्यान, गोळीबार करण्याआधी त्याने आपल्या सहकाऱ्याने तब्येत बरी नसल्याचं सांगितलं होतं. चेतन सिंहला ट्रेनमधून खाली उतरायचं होतं. पण त्याला त्याची शिफ्ट पूर्ण करण्यास सांगण्यात आलं. यामुळे तो चिडला आणि भांडू लागला. यानंतर त्याने आपल्या एका सहकाऱ्याचा गळा दाबवण्याचाही प्रयत्न केला.
गोळीबार करत चेतन सिंहने सहायक उपनिरीक्षक टीकाराम मीना आणि तीन प्रवाशांची हत्या केली, तेव्हा आरपीएफ कॉन्स्टेबल घनश्याम आचार्यही ट्रेनमध्ये होते. त्यांनी पोलिसांना नेमकं काय घडलं, ज्यामुळे आरोपी चेतनने गोळीबार केला याची सविस्तरपणे माहिती दिली आहे.
ट्रेनमधील धक्कादायक घटनाक्रम उलगडताना घनश्याम आचार्य यांनी सांगितलं की, मीना, कॉन्स्टेबर नरेंद्र परमार आणि चेतन सिंह यांच्यासह ते सुरक्षेसाठी तैनात होते. त्यांनी पहाटे 2 वाजून 53 मिनिटांनी मुंबईकडे जाणारी ट्रेन पकडली. मीना आणि चेतन हे एसी कंपार्टमेंटमध्ये तैनात होते तर घनश्याम आणि परमार हे स्लीपर कोचमध्ये कर्तव्यास होते.
"'ट्रेनमध्ये चढल्यानंतर अर्ध्या तासाने मी मीना यांना रिपोर्ट देण्यासाठी गेलो होतो. कॉन्स्टेबल चेतन सिंह आणि इत तीन टीसी त्यांच्यासोबत होते. मीन यांनी मला सांगितलं की, चेतनला बरं वाटत नाही. मी त्याला हात लावून ताप आला आहे का हे तपासलं. पण मला तसं काही जाणावलं नाही. चेतनला पुढील स्थानकावर उतरायचं होतं. पण मीना हे त्याला शिफ्ट संपण्यासाठी अजून दोन तास शिल्लक असल्याचं सांगत होते," अशी माहिती घनश्याम आचार्य यांनी दिली आहे.
घनश्याम आचार्य यांनी सांगितलं की, चेतन शर्मा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. "मीना यांनी यानंतर पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला आणि त्यांना मुंबई सेंट्रल कंट्रोल रुमला माहिती देण्यास सांगितलं. कंट्रोल रुममधील अधिकाऱ्यांनीही चेतनला आपले कामाचे तास पूर्ण कर आणि नंतर मुंबईत उपचार घे असं सांगितलं. मीन यांनी चेतनला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो काहीच ऐकत नव्हता," असं त्यांनी सांगितलं.
One of the victims of #JaipurExpressTerrorAttack is seen in this video. He is struggling for his life. pic.twitter.com/FWoIvw1E6m
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) August 1, 2023
मीन यांनी चेतनसाठी कोल्डड्रिंकही मागवलं, पण त्याने घेण्यास नकार दिला. "मीना यांनी मला चेतनची रायफल घे आणि त्याला आराम करु दे असं सांगितलं. मी त्याला B4 कोचमध्ये नेलं आणि एका रिकाम्या सीटवर झोपण्यास सांगितलं. मी त्याच्या शेजारी बसलो होतो. 10 मिनिटांनी त्याने त्याची रायफल परत मागितली. मी नकार दिला आणि त्याला आराम करण्यास सांगितलं. तो संतापला आणि माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्याने मला खाली पाडलं आणि हातातील रायफल खेचून घेतली. त्याने चुकून माझी रायफल घेतल्याचं माझ्या लक्षात आलं," असं घनश्याम आचार्य यांनी सांगितलं आहे.
घनश्याम आचार्य यांनी यानंतर तात्काळ वरिष्ठांना याची माहिती दिली. यानंतर घनश्याम आचार्य आणि मीना हे चेतन याच्याकडे गेले आणि रायफलची अदलाबदली झाल्याचं सांगितलं. "त्याने माझी रायफल परत दिली आणि त्याची घेतली. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता. मीना त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण तो वाद घालत होता, अजिबात ऐकत नव्हता. त्यामुळे मी तेथून निघालो. मी निघत असताना तो राय़फलने गोळीबार करण्याच्या मनस्थितीत असल्याचं लक्षात आलं. मी मीना यांनी सांगितलं असता त्यांनी त्याला शांत राहण्यास सांगितलं. पण काही वेळाने मी तेथून निघालो," असा खुलासा घनश्याम आचार्य यांनी केला आहे.
VIDEO | Railway Protection Force (RPF) jawan opens firing inside Jaipur-Mumbai train killing four people: Official. The jawan has been arrested and brought to Borivali Police Station. pic.twitter.com/86cFwbt3cq
— Press Trust of India (@PTI_News) July 31, 2023
पहाटे 5 वाजून 25 मिनिटांनी ट्रेन वैतरणा रेल्वे स्थानकावर दाखल झाली. "काही वेळाने मला आरपीएफ सहकाऱ्याचा फोन आला. त्याने मला एएसआय मीना यांना गोळी घातल्याचं सांगितलं. मी त्याला तुला कसं कळलं विचारलं असता, त्याने कोच अटेंडंटने माहिती दिल्याचं सांगितलं. मी बी5 च्या दिशेने पळत गेलो. काही प्रवासी माझ्या दिशेने पळत होते, ते घाबरले होते. त्यांनी मला चेतनने एएसआय मीना यांना गोळी घातल्याचं सांगितलं. मी नरेंद्र परमारला फोन करुन त्याची चौकशी केली. मी कंट्रोल रुमलाही फोन केला," अशी माहिती घनश्याम आचार्य यांनी दिली आहे.
घनश्याम आचार्य यांनी बी1 कोचजवळ चेतन दिसला. "त्याने हातात राय़फल पकडली होती आणि चेहऱ्यावर राग दिसत होता. तो मलाही गोळी घालेल असं वाटलं. त्यामुळे मी मागे वळलो. 10 मिनिटांनी कोणीतरी गाडीची चेन ओढली. मी अॅपवर चेक केलं असता ट्रेन मीरा रोड आणि दहिसर स्थानकादरम्यान होती. मी दरवाजातून पाहिलं असता चेतन दिसला. हातात रायफल घेऊन तो गोळीबार करण्याच्या तयारीत होती," असं त्यांनी सांगितलं.
घनश्याम आचार्य यांना गोळीबार ऐकू येत होता. त्यांनी प्रवाशांना खिडक्या बंद करण्यास आणि डोकं खाली ठेवा असं सांगितलं. "मला गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता. मी बाथरुममध्ये लपलो होतो. काही वेळाने बाहेर आलो असता चेतन ट्रॅकवर चालत होता. त्याच्या हातात रायफल होती. 15 मिनिटांनी ट्रेन सुरु झाली," अशी माहिती घनश्याम आचार्य यांनी दिली.
यानंतर घनश्याम आचार्य बी5 आणि बी6 कोचच्या दिशेने गेले. यावेळी त्यांना काही प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचं दिसलं. बोरिवली स्थानकात ट्रेन पोहोचल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. या सर्वांचा मृत्यू झाला होता.
अजगर अब्बास शेख (48) आणि अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन भानपुरवाला (62) अशी दोन मृत प्रवाशांची नावे आहेत. दरम्यान चेतन सिंगने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला अटक करण्यात आली. सध्या उच्चस्तरीय चौकशी सुरु आहे.