नाशिक : छगन भुजबळ हे पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. येत्या आठवडाभरात छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. भुजबळ काय करणार? यावरुन वेगवेगळ्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहेत, असं समीर भुजबळ यांनी सांगितलं असलं, तरी उद्धव ठाकरे भुजबळांच्या प्रवेशाबद्दल ठाम नकारही देत नाहीत. त्यामुळे भुजबळ नेमकं काय करणार? भुजबळ शिवसेनेत जाणार का? शिवसेना भुजबळांना घेणार का? भुजबळांच्या शिवसेनेत प्रवेशाच्या शक्यतेमुळे शिवसैनिक नाराज आहेत का? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भुजबळांच्या पाठीशी राहणार का? या सगळ्या प्रश्नांची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.
भुजबळ आठवडाभऱात शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. साहेबांची अटक कशी विसरायची? म्हणत शिवसेनेत विशेषतः नाशिकमधल्या शिवसैनिकांच्या मनात खदखद आहे. पण शेवटी मातोश्रीचा निर्णय त्यांना मान्य आहे. तर दुसरीकडे नाशिकमधले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण म्हणत भुजबळांच्या पाठीशी आहेत.
गेली कित्येक दशकं छगन भुजबळ यांची तोफ राजकारणाच्या मैदानात धडाडली आहे. आधी शिवसेना, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा झंझावाती प्रवास झाल्यावर आता भुजबळांना पुन्हा कदाचित घरवापसीचे वेध लागले आहेत.