नवी दिल्ली : मला घाणेरड्या राजकारणाचा वीट आलाय म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे धक्कादायक वक्तव्य भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले. झी 24 तासला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हा खुलासा केला आहे. मी परिस्थितीला दोष देत नाही, कदाचित माझंही चुकंल असेल. पण शनीची साडेसाती लागल्याचे सांगत शनी कोण आहे याबद्दल माहिती असल्याचेही ते म्हणाले. मधल्या कालखंडामध्ये मी अनुभवलं त्यावरुन मला राजकारणाची घृणा वाटू लागली आहे. पण अशा घाणेरड्या राजकारणाचा मला वीट आल्याचेही ते म्हणाले. विधानसभा लढवण्याबाबत अजून ठरवलं नसल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांमध्ये दु:ख केवळ माझ्याच वाट्याला आली असं दु:खही त्यांनी व्यक्त केलं.
लोकसभेत भाजपला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात येतील याकडे आमचे सध्या लक्ष आहे. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करेल. विधानसभा जवळ आल्यावर त्या लढवायच्या की नाही हा विचार त्यावेळी घेईन असेही ते म्हणाले.
ज्या व्यक्तीने 40 वर्षे भाजपाच्या वाढीसाठी प्रयत्न केला. अस असताना त्याच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. त्यात कोणतेही तथ्य नव्हते. असा प्रसंग कोणावर येऊ नये. हे मला क्लेशदायक वाटते. जो मनस्ताप मला सहन करावा लागला ती म्हणजे शनीची साडेसाती असल्याचे मला वाटते. तो शनी कोण आहे हे देखील मला माहित असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.