यवतमाळ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला

महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत देखील दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावाची चर्चा 

Updated: Jan 13, 2020, 07:07 AM IST
यवतमाळ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला title=

यवतमाळ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची निश्चिती झाली असून उमेदवारीसाठी शिवसेनेने दुष्यंत चतुर्वेदी यांचे नाव निश्चित झाले आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावावर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले असून महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत देखील दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावाची चर्चा झाली. 

दुष्यंत हे विदर्भातील काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र असून सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. यवतमाळातून विधानपरिषद सदस्य असलेले तानाजी सावंत ह्यांनी राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. निवडून आल्यानंतर पुन्हा कधीच यवतमाळ मध्ये न फिरकलेल्या सावंत यांच्याप्रमाणेच पुन्हा बाहेरचा उमेदवार दिला गेल्याने शिवसेनेच्या स्थानिक ईच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आहे. 

त्यामुळे निवडणुकीत बंडखोरीची देखील शक्यता आहे. दरम्यान भाजप दुष्यंत चतुर्वेदी यांच्या तोडीचा कोणता उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार याकडे लक्ष लागलेले आहे.

कोण आहेत दुष्यंत चतुर्वेदी ?

नागपूर विद्यापीठातून वाणिज्य शाखेचे पदवीधर असललेले दुष्यंत, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य असून विदर्भ माथाडी कामगार संघाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. गेल्या २८ वर्षांपासून नागपूरमधील लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षणसंस्थेद्वारा संचालित विद्यालय व महाविद्यालयांचे सफल संचालन करीत आहे. 

त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये २००० हुन अधिक उच्चशिक्षित शिक्षकांसहीत शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. यात २० हजारांहून अधिक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. विदर्भात आणि प्रामुख्याने नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात शिवसेनेचे नेतृत्व करणारे फारसे नेते नसल्याने चतुर्वेदी यांना शिवसेनेत आणून पक्ष मजबूत करण्याची रणनीती शिवसेनेने आखली होती त्यानुसार आता यवतमाळ विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदींना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.