Exclusive Interview With Rohit Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते तसेच राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील याचे सुपुत्र रोहित पाटील यांनी 'झी 24 तास'ला विशेष मुलाखती दिली आहे. रोहित पाटील यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींबद्दल 'झी 24 तास'चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या. वडिलांच्या निधनानंतरच्या काही भावनिक प्रसंगावर प्रकाश टाकतानाच आपली राजकीय महत्त्वाकांशा काय आहे याबद्दलही शरद पवार गटाच्या या तरुण नेतृत्वाने दिलखुलासपणे 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमामध्ये भाष्य केलं आहे.
वडिलांच्या निधानानंतर आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागल्याचं रोहित यांनी अधोरेखित केलं. मुलाखतीमध्ये एके ठिकाणी रोहित पाटील यांनी केलेल्या "अनेकदा मान अपमानाचे प्रसंग आले. अनेकदा अशीही परिस्थिती आली की जे लोक घरी तासन् तास थांबायचे तेच लोक भेटायला वेळ देत नाही असेही प्रसंग आले," या सूचक विधानावरुन त्यांच्या संघर्षाचा अंदाज बांधता येतो.
आर. आर. पाटील हे त्यांच्या साध्या राहणीमानासाठी ओळखले जायचे. त्यांनी घेतलेले आणि न घेतलेले अनेक निर्णय अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चेत असतात.अशाच एका प्रश्नावरही रोहित यांनी या मुलाखतीत भाष्य केलं आहे. 'लोक म्हणतात आबांनी कुटुंबाला मुंबईत आणायला हवं होतं. तुम्हाला काय वाटतं?' या प्रश्नावरही रोहित पाटील यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. "त्यांनी (आर. आर. पाटील यांनी) जो निर्णय घेतला होता त्यामागे त्यांची दूरदृष्टी आज समोर आली," असं एका प्रश्नाला उत्तर देताना रोहित पाटील म्हणाले. तसेच या मुलाखतीमध्ये रोहित पाटील यांना वडिलांबद्दल वाटणारा आदर, त्यांच्या, "आज वडील समोर उभे राहिले तर कृतज्ञतेच्या भावनेनं त्यांचे आभार मानेन," या वाक्यातून कळून येतो.
भविष्यातील आपल्या राजकीय वाटचालीसंदर्भात भाष्य करताना रोहित पाटील यांनी, "वडिलांनी कमावलं होतं ते कमावयचं आहे. ते गमावताना बघितलं आहे त्यामुळे ते गमवण्याची भूक जास्त आहे," असं म्हटलं असून संघर्ष अटळ असल्याची जाणीव आपल्याला असल्याचं अधोरेखित केलं आहे.
रोहित पाटील यांची ही संपूर्ण विशेष मुलाखत आज (शनिवार, 20 जुलै 2024) रात्री 9 वाजता आणि उद्या म्हणजेच रविवार, 21 जुलै रोजी दुपारी 12 वाजता 'झी 24 तास'वर पाहता येईल.