मुंबई: वरळी कोळीवाडा परिसरातील चौघांना कोरोना व्हायरसची (COVID-19) लागण झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर मुंबईतील प्रशासकीय यंत्रणांनी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांकडून परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
पुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
विशेष म्हणजे या चार संशयितांपैकी एकानेही परदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात जाऊन साथीच्या रोगाप्रमाणे त्याचा फैलाव सुरु होण्याची भीती आहे. त्यामुळे या परिसरातील संक्रमण इतरत्र पसरू नये, यासाठी पोलिसांनी संपूर्ण वरळी कोळीवाड्याची नाकाबंदी केली आहे. यासाठी पोलिसांनी बॅरिकेटस उभारले आहेत. तसेच पोलिसांच्या गाड्यांमधून ध्वनीक्षेपकावरून सातत्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
कोरोना : पोलिसांकडून आता नाकाबंदी आणि कठोर कारवाई
प्राथमिक माहितीनुसार, चार संशयितांपैकी एकजण ट्रॉम्बे येथे शेफ म्हणून कामाला होता. त्यामुळे आता त्याच्यासोबतच्या सर्व कर्मचाऱ्यांचीही कोरोना टेस्ट केली जाणार आहे. तर उर्वरित तिघेजण वरळीतच कामाला आहेत. मात्र, तरीही या लोकांना कोरोनाची लागण कशी झाली, याचा शोध सुरु असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, देशात लॉकडाऊन जाहीर होऊनही मुंबईतील लोक गांभीर्याने वागत नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता गृह मंत्रालयाकडून आणखी कडक पावले उचलली आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.