मुंबई: दुष्काळ, आरक्षण, बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक आघाडीवरचे अपयश या समस्यांमुळे फडणवीस सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी असली तरी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजपच नंबर १ चा पक्ष राहील, असा निष्कर्ष सी वोटर्स आणि एबीपी माझाच्या सर्वेक्षणातून पुढे आला आहे.
यापूर्वी भाजपकडून गुप्तपणे करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणांमध्ये अनेक खासदार आणि आमदारांचे भवितव्य धोक्यात असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे भाजपच्या गोटातील चिंता वाढली होती. मात्र, सी वोटर्स आणि एबीपी माझाच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पाहता भाजपची परिस्थिती तितकीही वाईट नसल्याचे स्पष्ट होत आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला ३००, काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला ११६ तर इतर पक्षांना १२७ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपासोबत युती केली तर एनडीएला पहिल्या क्रमांकाच्या ३४ जागा मिळतील. तर यूपीएला १४ जागांवर विजय मिळेल.
मात्र, सर्व पक्ष वेगवेगळे लढल्यास भाजप आणि मित्रपक्षांना लोकसभेच्या २३ जागा, काँग्रेस आणि मित्रपक्षांना १४ , राष्ट्रवादीला ६ आणि शिवसेनेला सगळ्यात कमी ५ जागा मिळतील, असा अंदाज या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.
याशिवाय, महाराष्ट्रातील जनतेला नरेंद्र मोदींचे नेतृत्व अजूनही आश्वासक वाटत आहे. राज्यातील ६४ टक्के लोक त्यांच्या कारभारावर समाधानी आहेत. तर १३.४ टक्के मतदारांनी शरद पवारांना कौल दिला आहे. तर काँग्रेस पक्षाचे सामूहिक नेतृत्व २४ टक्के लोकांना पसंत असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून पुढे आला आहे.
तसेच विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात कमळच फुलेल, अशी दाट शक्यता आहे. सर्वात सक्षम नेता म्हणून १९.३ टक्के मतदारांनी देवेंद्र फडणवीस यांनाच कौल दिला आहे. त्यापाठोपाठ जनतेने शरद पवारांच्या नेतृत्वाला पसंती दर्शविली आहे. १८.७ टक्के लोकांनी त्यांच्या पारड्यात दान टाकले आहे. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला ११.८ टक्के लोकांनी पसंती दर्शवली. तर राज ठाकरेंना ९ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.