जनआशीर्वाद यात्रा संपल्यानंतर कोकणातून राणेंना धक्का, भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

कोकणात नारायण राणे यांनी जनआशिर्वाद यात्रा काढली पण त्यांना आशिर्वाद काही मिळाली नाही, अशी टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

Updated: Sep 2, 2021, 08:10 PM IST
जनआशीर्वाद यात्रा संपल्यानंतर कोकणातून राणेंना धक्का, भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश title=

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची कोकणात जनआशीर्वाद यात्रा (Janashirvad Yatra) पार पडली. कोकणातील (Kokan) विविध भागांमध्ये त्यांनी यात्रा काढली. या जनआशिर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका जोरदार केली. पण जनआशिर्वाद यात्रा संपून काही दिवस होत नाहीत तोच कोकणात राणेंना धक्का बसला आहे. 

देवगडचे भाजपच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. वर्षा निवास्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हर्षा ठाकूर आणि विकास कोयंडे या दोन नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं.

राणेंना जन आशिर्वाद मिळाला नाही

'कोकणात जनआशिर्वाद यात्रा निघाली, पण त्यानंतर भाजपमध्ये नाराजी पसरली, नितेश राणे आणि त्यांचे वडिल यांचं कोकणात फक्त स्वागत झालं पण जनआशिर्वाद त्यांना मिळाला नाही', अशी टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. जन आशिर्वाद यात्रा हीच येड्यांची जत्रा होती, असं उत्तरही त्यांनी नितेश राणे यांना दिलं आहे.

भाजप झालीय राणे समर्थक

भाजप राणे समर्थक झालं आहे, त्यामुळे कंटाळून आपण शिवसेनेत प्रवेश केला, अशी प्रतिक्रिया नगरसेविका हर्षा ठाकूर यांनी दिली आहे. 5 वर्ष आपण भाजपच्या नगरसेविका म्हणून काम केलं, त्याआधी भाजपची पंचायत समिती सदस्य म्हणूनही काम केलं, पण सध्या भाजपमध्ये घाणेरडं राजकारण केलं जात आहे, त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं हर्षा ठाकूर यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे यांची टीका

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करुन.. आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेड बनवायचं... यालाच म्हणतात येड्यांची जत्रा!!, अशा शब्दात नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.