मुंबई : 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारने त्यांच्या कोट्यातुन मोफत लस देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
केंद्र सरकारने 18 वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांना लस देण्यास परवानगी दिली आहे. यातील 50% लस ही केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या कोट्यातुन मोफत लस देण्याची व्यवस्था करावी असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.
देशातील अनेक मध्यप्रदेश, बिहार या राज्यांनी मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित लोकांची संख्या जास्त असल्यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाला आहे. सद्यस्थितीतील टाळेबंदी लावण्याच्या आधीसुद्धा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दोन दोन आठवडे टाळेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे राज्यातील नागरिकांना सरकारने आता तरी मदत करावी असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.
पहिल्या टाळेबंदीनंतर महाराष्ट्र सरकारने कुठलंही पॅकेज अथवा मदत ही सर्वसामान्य माणसाला केली नव्हती. त्यामुळे अकार्यक्षम सरकार अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कोरोना विरुद्धच्या लसीकरण कार्यक्रमात आपली अकार्यक्षमता न दाखवता सर्व बाबी लक्षात घेऊन 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारने आपल्या कोट्यातून मोफत लस द्यावी अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.