मुंबई : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरातून अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू असं ट्विट देखील अनिल देशमुख यांनी केलं आहे. २०१८ साली इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
No one is above the law. Maharashtra Police will work as per the law: Maharashtra Home Minister Anil Deshmukh https://t.co/qJ9p67TxIV pic.twitter.com/UsvIhmrgs8
— ANI (@ANI) November 4, 2020
'कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल.' अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे. शिवाय संबंधीत केस बंद झाली होती. मात्र अन्वय नाईक यांच्या पत्नीने केस पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने ही केस पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचं देखील देशमुखांनी सांगितले.
काय आहे प्रकरण
५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक आणि आई कुमुद नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन इसमांनी नाईक यांचे ५.४० कोटी रुपये थकवल्याचा आरोप करत त्यांनी गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होतं. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून रायगड पोलिसांकडून कलम ३०६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.