मुंबई : ठाकरे सरकारवर रोज टीकेची झोड उठवणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी एका महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ पुन्हा ट्वीट केला आहे. महिला कॉन्स्टेबल रस्त्यावरच कोसळली असताना सोबत असलेल्या पोलिसांपैकी कुणीच मदतीला आले नाही असं सांगत सोमैयांनी हा विषय राज्यपालांकडे उपस्थित केल्याची माहिती दिली आहे. तर सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवणाऱ्या किरीट सोमैयांना अटक करा, अशी मागणी मनसेने केली आहे.
किरीट सोमैया यांनी सोमवारी ट्वीट करून ग्रँट रोड येथे एक महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ ट्वीट करून ती कोरोना त्रस्त असल्याचे आणि अँम्ब्युलन्सची प्रतीक्षा करत असल्याचे म्हटले होते. तर मुंबई पोलिसांनी सोमैया यांना ट्वीटरवरच उत्तर देताना, तो व्हिडिओ १६ मे रोजीचा असल्याचे आणि ती महिला कॉन्स्टेबल कोरोना बाधित नव्हती आणि पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे म्हटले होते.
We appreciate your concern sir, but this is an old video from 16.05.2020 and is not related to COVID-19. The lady corona warrior is absolutely healthy & she never tested positive for COVID-19. We request all citizens to not circulate unverified content. https://t.co/fS5Xdb2Sis
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 24, 2020
पण सोमैयांनी पुन्हा व्हिडिओ ट्वीट करून संबंधित महिला कॉन्टेबलला बरोबरच्या पोलिसांपैकी कुणीही मदत केली नाही, असं म्हटलं आहे. याबाबतची तक्रार राज्यपालांकडे केल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
हतबल झालेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडिओ जोडत आहे, ग्रॅंटरोड क्वारनंटाईन सेंटरजवळ ड्युटी करत असताना (10 दिवसांपूर्वी) तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, ती रस्त्यावर कोसळली. 5 पोलिस सोबत होते, त्या पैकी कुणी ही मदतीला आले नाही. का? राज्यपाल कडे मी हा विषय उपस्थित केला pic.twitter.com/xVzZ5oy7gy
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 26, 2020
किरीट सोमैया सातत्याने व्हिडिओ पाठवून सरकारवर टीका करत आहेत. त्यांनी पाठवलेल्या व्हिडिओपैकी राजावाडी रुग्णालयातील व्हिडिओबाबतही वस्तुस्थिती वेगळी असल्याचा खुलासा मुंबई महापालिकेने केला होता. या पार्श्वभूमीवर मनसेने किरीट सोमैयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी किरीट सोमैया यांना अटक करण्याची मागणी केली आहे. खोपकर यांनी म्हटले आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या कलम ५४ अंतर्गत फेक न्यूज पसरवणाऱ्यांना एक वर्ष तुरुंगवास होऊ शकतो. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मार्च महिन्यात हा इशारा दिलेला आहे. मुंबई पोलिसांना विनंतीवजा आवाहन आहे की, कायद्याचा आदर राखत किरीट सोमैयांना त्वरित अटक करावी. किरीट सोमैयांचे सोशल मीडियावरचे उद्योग लोकांनी बघितलेच आहेत, पण फेक न्यूज पसरवणं हा गुन्हा आहे हेसुद्धा लोकांना कळायला पाहिजे.
किरीट सोमैयांना अटक करण्याची मागणी मनसेनं केली आहे. तर सोमैया यांनी सरकारला उलट आव्हान देताना ठाकरे सरकारने आपल्यावर कारवाई करून दाखवावी, असं म्हटलं आहे.