मुंबई : विरारमधल्या अर्नाळा समुद्रकिनारी पोहत असताना बुडालेल्या महिलेला स्थानिकांनी मोठ्या कसरतीने वाचवले आहे. रविवार निमित्ताने अनेक पर्यटक मौजमजेसाठी अर्नाळा समुद्रकिनारी आले होते. मात्र हा समुद्रकिनारा कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या रेती उपशामुळे खचला आहे.
पर्यटकांना याबाबत कोणतीही कल्पना नसल्यानं उत्साही पर्यटक पाण्यात खोल जाऊन पोहोण्याचा आनंद घेतात.
दुपारी चार वाजण्याच्या सुमाराला असंच एक कुटुंब पाण्यात उतरलं असताना तिथला अंदाज न आल्याने महिला भरतीच्या पाण्यात वाहून गेली. पाण्याच्या लाटांमध्ये ती तरंगत होती. त्यावेळी स्थानिकांच्या मदतीने मानवी साखळी तयार करून या महिलेला वाचवण्यात आलं.
गंभीर बाब म्हणजे अर्नाळा समुद्रकिनारी गेल्या आठवड्यात जबलपूर इथून आलेल्या दोघांचा पाण्यात बुडून अंत झाला होता.
दरम्यान मुंबईतल्या जुहू समुद्रकिनाऱ्यावरही आज बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला.