मुंबई: राज्यात शिवसेना आणि भाजपकडून स्वतंत्रपणे सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्यामुळे बंडखोरांचा भाव चांगलाच वधारला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून बंडखोर आपल्या गोटात ओढण्यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. मीरा-भाईंदरच्या बंडखोर आमदार गीता जैन यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा दिला होता. तत्पूर्वी गीता जैन यांनी शनिवारी एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचीही घेतली होती.
विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरांना युतीत स्थान मिळणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र, निकालानंतर सत्तास्थापनेची गणिते जुळवण्यासाठी भाजपने आपली भूमिका ३६० अंशात बदलली आहे.
शिवसेना आणि भाजपचे नेते स्वतंत्रपणे राज्यपालांच्या भेटीला
गीता जैन यांच्यापाठोपाठ अपक्ष आमदार रवी राणा आणि राजेंद्र राऊत यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेला आतापर्यंत चार आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांचा समावेश आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६० वर पोहोचले होते.
...तर पंकजा मुंडेंना पुन्हा निवडून आणणार?
दरम्यान, आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते १०.३० वाजता राज्यपालांची भेट घेतली. ही भेट केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी होती, असे रावते यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तर थोड्याचवेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे सत्तास्थापनेच्या हालचाली करत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, ही भेट केवळ परस्परांवरील दबाव वाढवण्यासाठी असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.