मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यापासून राज ठाकरे आणि भाजपमधील जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असा अनेकांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी रविवारी सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे.
यापूर्वीही मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी सुरु असताना आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ही भेट वैयक्तिक स्वरुपाची असल्याचे त्यावेळी शेलार यांनी स्पष्ट केले होते. यानंतर आज आशिष शेलार यांनी थेट राज ठाकरे यांचे कृष्णकुंज निवासस्थान गाठले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा सुरु होती. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.
राज ठाकरे आणि फडणवीसांची गुप्त बैठक; नव्या आघाडीचे संकेत
२०२२ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकासआघाडी एकत्रपणे लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी जड जाऊ शकते. त्यामुळे भाजपकडून मनसेशी हातमिळवणी केली जाऊ शकते. राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या सभेत नागरिकत्व सुधारण कायद्यावरून (CAA) केंद्र सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. या गोष्टी भाजपला पूरक असल्याने दोन्ही पक्षांची युती होण्याची दाट शक्यता आहे.