मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आली. रात्री उशीरा त्यांना जामीन मंजूर झाला. पण या प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध भाजपा असा वादाचा नवा अंक सुरु झाला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. नारायण राणे याआधीही त्यांच्या शैलीत बोलले आहेत, पण यावेळी आकांडतांडव करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न म्हणजे राणे यांच्या त्या वाक्यावरचा राग नसून मुख्यमंत्र्यांचं स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव दिनाचं अज्ञान उघड झाल्याचा थयथयाट आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
स्वत:च अज्ञान उघड झालं, ते लपवायचं कसं म्हणून हा सर्व थयथयाट आहे, असं सांगत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देशाची आणि महाराष्ट्राची क्षमायाचना करणार आहात का? असा सवाल उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री 75वा अमृतमहोत्सव विसरतात, यासाठी भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 75 हजार पत्र लिहिणार असल्याचंही आशिष शेलार यांनी सांगितलं. 'हा भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा 75 वा अमृत महोत्सव आहे, कृपया लक्षात ठेवा', अशा स्वरुपाची 75 हजार पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे. यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहणार नसेल तर पुढच्या टप्प्यात गांधीगिरी करुन पण फुलं नाहीत तर काटे पाठवून त्यांना लक्षात राहण्याचा प्रयत्न भाजप करणार असल्याचं भाजपने म्हटलं आहे.