देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'मालमत्ता कर' थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत. करनिर्धारण आणि संकलन खात्याचे पथक भेटीला येताच करदाते धनादेश (चेक), धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सोपवित आहेत. तर, काहीजण विहीत मुदतीत कर भरणा करण्याचे आश्र्वासित करत आहेत. दरम्यान, नागरिकांनी वेळेत कर भरणा करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मालमत्ता कर थकबाकी असणा-या मोठ्या थकबाकीदारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाचा कर आणि थकीत कर भरणा करावा यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. थकबाकी व चालू आर्थिक वर्षाचा कर वसुलीसाठी अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. करदात्यांना कर भरणा करण्याचे आवाहन मायकिंगद्वारे, दर्शनीय ठळक बॅनरद्वारे तसेच स्थानिक केबलद्वारे जनजागृती करून दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत करभरणा करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात येत आहे.
मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका करनिर्धारण व संकलन खात्याद्वारे जनजागृतीचा धडाका आहे. जनजागृती, वारंवार आवाहन, मोबाईलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
नागरिकांनी त्यांचा मालमत्ता कर 31 मार्चपर्यंत तातडीने महानगरपालिकेकडे जमा करावा, याकरिता अधिकारीवर्ग प्रत्यक्षात करदात्यांना भेटून त्यांना मालमत्ता कराचा भरणा करण्यास प्रोत्साहित करत आहेत. नागरिकांना कर देयके विहित कालावधीत टपालामार्फत प्राप्त न झाल्यास महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन अथवा विभाग कार्यालयातून प्राप्त करुन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
मेसर्स भारत डायमंड फोर्स आणि गोदरेज ग्रीन होम्स लिमिटेड यांनी 25 मार्च रोजी नियमित कर भरणा करण्याचे आश्र्वासित केले आहे. ते थकबाकीदार नसून प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये वेळेत कर भरणा करतात. त्यांचा चालू आर्थिक वर्षाचा कर 31 मार्चपूर्वी भरून महानगरपालिकेला सहकार्य करणार आहेत.
न्यू दाऊद बाग 18 कोटी 15 लाख 33 हजार 843
मेसर्स फिनिक्स मॉल 17 कोटी 60 लाख 78 हजार 592
न्यू दाऊद बाग 10 कोटी 99 लाख 32 हजार 659
एच. एम. मॉल, श्री ग्रुप 10 कोटी 61 लाख 7 हजार 308
वोक्हार्ड रूग्णालय 8 कोटी 47 हजार 185
सुप्रिम बिझनेस पार्क 8 कोटी 8 लाख 62 हजार 316
आयओरी प्रॉपर्टीज इन ऑरर्बीट मॉल 7 कोटी 72 लाख 35 हजार 370
एक्सप्रेस झोन 2 कोटी 70 लाख 25 हजार 328
आनंद राज इंडस्ट्रीयल 2 कोटी 58 लाख 88 हजार 819
हॉटेल लिला व्हेन्टायर 2 कोटी 27 लाख 67 हजार 387